IPL 2023: आयपीएलमध्ये शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यातील सामन्यात अनेक अनपेक्षित धक्के मिळाले. बंगळुरुने पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव केला असल्याने त्यांचं पारडं जड होतं. दुसरीकडे कोलकाता पंजाबने पराभव केल्यानंतर या सामन्यात खेळत होती. पण सामन्यात नेमकं उलटं झालं आणि क्रिकेटरसिकांनाही एका मनोरंजक सामन्याचा अनुभव मिळाला. बंगळुरुने अपेक्षेप्रमाणे एकहाती सामना जिंकण्याच्या अपेक्षा निर्माण केल्या असतानाच कोलकाताच्या खेळाडूंनी जबरदस्त पुनरागमन करत सामना जिंकला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने 204 धावा केल्या. महत्त्वाचं म्हणजे एका क्षणी कोलकाताची स्थिती 89 धावांवर पाच गडी बाद होती. यामुळे बंगळुरु सहजपणे एकहाती सामना जिंकेल असं वाटत होतं. मात्र फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारल्यानंतर कोलकाताच्या गोलंदाजांनीही चांगली कामगिरी करत बंगळुरुच्या फलंदाजांना रोखलं आणि सामना जिंकला. 


कोलकाता जिंकली असली तर फलंदाज मनदीप सिंग मात्र टीकेचा धनी झाला आहे. याचं कारण म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर येणारा मनदीप सिंग शून्यावर बाद झाला. भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू आणि समालोचक सुनील गावसकर यांनीही मनदीप सिंगला खडे बोल सुनावत फटकारलं आहे. गेल्या आयपीएलमध्येही मनदीप सिंगने चांगली कामगिरी केली नसल्याने सुनील गावसकर यांनी नाराजी जाहीर केली. "त्याने फार काही कामगिरी केलेली नसली तरी दरवेळी एखाद्या संघात स्थान मिळतं," असा टोलाच सुनील गावसकर यांनी लगावला आहे. 


कोलकाताकडून खेळातना रहमनुल्लाह गुरबज याने आपल्या पहिल्या अर्धशतकाची नोंद केली. दुसरीकडे सातव्या क्रमांकावर आलेल्या शार्दूल ठाकूरने फक्त 29 चेंडूत 68 धावा ठोकत संघाची धावसंख्या 200 च्या पार नेली. रसेल या सामन्यात शून्यावर बाद झाला. दरम्यान बंगळुरुचा संपूर्ण संघ अवघ्या 123 रन्सवर तंबूत परतला आणि कोलकाताने 81 धावांनी हा सामना जिंकला. 


कोलकाताकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 68 धावा केल्या. दरम्यान रिंकू सिंगने 46 धाव केल्या. दोघांनी सहाव्या विकेटसाठी 102 धावांची भागीदारी केली. पण शार्दुल, रहमनुल्लाह  आणि रिंकू सिंग वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या उभारता आली नाही.