IPL 2024 CSK Beat MI Hardik Pandya Talks About Dhoni: इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएलच्या 29 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने मुंबई इंडियन्सला त्यांच्या घरच्या मैदानावर धूळ चारली. रविवारी वानखेडे स्टेडियमवर झालेला सामना सीएसकेने 20 धावांनी जिंकला. चेन्नईने 200 हून अधिक धावांचं लक्ष्य मुंबईला दिलं होतं. मात्र मुंबईला 186 धावांपर्यंतच मजल मारता आली. या सामन्यामध्ये चेन्नईच्या संघाने टिचून गोलंदाजी करत मुंबईच्या फलंदाजांना फटकेबाजी करण्यापासून रोखलं. या सामन्यामध्ये मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याला गोलंदाजी आणि फलंदाजीमध्येही चमक दाखवता आली नाही. विशेष म्हणजे सामना संपल्यानंतर हार्दिकने 'स्टम्पमागील व्यक्ती' असा उल्लेख करत सामन्याच्या विजयाचं श्रेय कर्णधार ऋतुराज गायकवाडऐवजी महेंद्र सिंह धोनीला दिल्याचं पाहायला मिळालं. हार्दिकने सामन्यानंतर नोंदवलेली ही प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरत आहे.


सामन्याच्या पहिल्या डावात काय घडलं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलच्या 29 व्या सामन्याचा टॉस मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने जिंकला. पंड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईकडून कर्णधार ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 69 धावांची खेळी केली. शिवम दुबेने नाबाद 66 धावांची खेळी केली. महेंद्र सिंह धोनीने शेवटच्या ओव्हरमध्ये हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर शेवटच्या 4 बॉलमध्ये 3 षटकरांच्या मदतीने 20 धावा कुटल्या आणि संघाला 200 धावांचा टप्पा ओलांडण्यास मदत केली. मुंबईकडून हार्दिकने पंड्याने 43 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. श्रेयस गोपाल, गेराल्ड कोएत्झीने प्रत्येकी एक विकेट घेतली.


मुंबईची तारांबळ


207 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाला 186 धावांपर्यंतच मजल मारता आली. रोहित शर्माने झळकावलेलं शतक संघाच्या विजयाच्या कामी आलं नाही. रोहित 63 बॉलमध्ये 105 धावा करुन नाबाद राहिला. रोहितला तिलक वर्मा वगळता कोणीच फारशी साथ दिली नाही. एकीकडे रोहित फटकेबाजी करत असताना दुसऱ्या बाजूला वेळोवेळी विकेट्स पडत राहिल्या. चेन्नईच्या गोलंदाजांनी क्षेत्ररक्षणानुसार गोलंदाजी केल्याने मुंबईच्या फलंदाजांना चौकार, षटकार लगावता आले नाहीत. गोलंदाजांनी जाणूनबुजून लांब पल्ल्याच्या बॉण्ड्रीच्या दिशेने गोलंदाजी केल्याने मुंबईच्या फलंदाजांना धावगती वाढवण्याची गरज होती तेव्हा सामाधानकारक धावा करता आल्या नाहीत. चेन्नईकडून मथीशा पाथिरानाने 28 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. तुषार देशपांडे, मुस्ताफिझूर रहमानने प्रत्येकी एक विकेट घेतली. चेन्नईचा हा चौथा विजय ठरला आहे.


सामना जिंकल्यानंतर ऋतुराज काय म्हणाला?


सामना जिंकल्यानंतर दोन्ही कर्णधारांनी आपआपल्या प्रतिक्रिया नोंदवताना पाथिरानाचा आवर्जून उल्लेख केला. ऋतुराजने सामना गोलंदाजांमुळे जिंकल्याचं नमूद केलं. "त्यांनी (मुंबईच्या संघाने) काही उत्तम आणि मोठे फटके मारल्यानंतरही आम्ही गोलंदाजीसंदर्भात जे प्लॅनिंग केलं होतं ते अगदी उत्तमरित्या अंमलात आणण्यात आम्हाला यश आलं. मला पॉवर प्लेच्या 6 ओव्हरमध्ये 60 धावा फलकावर पाहायला आवडल्या असत्या. या मैदानावर खेळताना तुम्ही गोलंदाजी आणि फलंदाजीसंदर्भात ध्येय निश्चित केलं पाहिजे. आमच्या मलिंगाने (पाथिरानाने) उत्तम गोलंदाजी केली. त्याने अगदी भन्नाट यॉर्कर टाकले," असं सामना जिंकल्यानंतर ऋतुराजने म्हटलं.


नक्की पाहा Video >> 'धोनी त्याला 'CSK ची कतरिना कैफ' म्हणतो'; पत्नीनेच केला रंजक खुलासा! Video पाहाच


पंड्याने केला धोनीचा उल्लेख


सामना गमावल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया नोंदवताना हार्दिक पंड्याने चेन्नईच्या गोलंदाजांचं कौतुक केलं. "आम्हाला दिलेलं लक्ष्य साध्य करण्यासारखं होतं. मात्र त्यांनी फारच उत्तम गोलंदाजी केली. पाथिरानाने केलेली कामगिरीच विजय आणि पराभवातील अंतर ठरली. ते त्यांच्या नियोजनामध्ये आणि सामन्याकडे पाहण्याच्या दृष्टीकोनासंदर्भात आमच्याहून सरस निघाले," असं पंड्या म्हणाला. तसेच पुढे बोलताना हार्दिक पंड्याने धोनीच्या मार्गदर्शनाला चेन्नईच्या संघाला फायदा होत असल्याचं म्हटलं. "त्यांना (चेन्नईच्या संघाला) स्टम्पमागे उभा असलेली व्यक्ती (धोनी) कोणत्या गोष्टी कशा केल्याने उपयोगी ठरतील आणि कोणत्या गोष्टी फायद्याच्या ठरणार नाही यासंदर्भातील मार्गदर्शन त्यांच्या गोलंदाजांना करते आणि त्याचा त्यांना फायदा होतोय. खेळपट्टीवरुन चेंडू थोडा थांबून येत होता आणि त्यामुळेच धावा करणं कठीण गेलं," असं हार्दिक म्हणाला.



...त्यामुळे मला आत्मविश्वास मिळाला; पाथिरानाने सांगितलं गुपित


4 ओव्हरमध्ये 28 धावा देऊन मुंबईचे 4 गडी बाद करणाऱ्या मथीशा पाथिराना सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार जिंकल्यानंतर पाथिरानाने, "आम्ही पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करत होतो तेव्हा मी थोडा नर्व्हस होतो. मला शांत राहण्याचा सल्ला देत जे करायला सांगितलं आहे ते कर असं सांगण्यात आलं. त्यामुळे मला आत्मविश्वास मिळाला," असं सांगितलं. पुढे बोलताना, "मी परिणाम काय होतील याचा फारसा विचार न करता गोलंदाजी केली. मी केवळ माझ्या नियोजित पद्धतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. ते बरोबर झालं तर मला अपेक्षित निकाल मिळेल हे ठाऊक होतं. सारे काही तसेच घडले," असं पाथिराना म्हणाला.