CSK vs LSG 20th Over Batting By Marcus Stoinis: इंडियन प्रिमिअर लीगच्या 39 व्या सामन्यामध्ये लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाने चेन्नई सुपर किंग्जच्या संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर धूळ चारली. चेन्नईच्या संघाने दिलेलं 210 धावांचं आव्हान एलएसजीच्या संघाने 3 चेंडू शिल्लक असतानाच पूर्ण केलं. हा सामना एलएसजीनं 6 विकेट्सनं जिंकला. या विजयासहीत एसएलजीनं पॉइण्ट्स टेबलमध्ये टॉप 4 मध्ये झेप घेतली असून चेन्नईचा संघ मात्र टॉप 4 मधून खाली घसरला आहे. या सामन्याचा खरा हिरो ठरला मार्कस स्टॉयनिस! त्याने एकट्यानेच 211 पैकी 124 धावा केल्या. तो नाबाद राहिला. त्याने 63 बॉलमध्ये केलेल्या नाबाद 124 धावांसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. विशेष म्हणजे या सामन्यामध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये लखनऊच्या संघाला विजयासाठी 6 बॉलमध्ये 17 हव्या असताना लखनऊने हा सामना 3 चेंडू राखून जिंकला. म्हणजेच मार्कस स्टॉयनिसने 3 बॉलमध्ये 17 धावा कुटल्या. नक्की घडलं काय शेवटच्या ओव्हरमध्ये पाहूयात...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

> शेवटच्या ओव्हरमध्ये लखनऊला 17 धावा हव्या होत्या. मार्कस स्टॉयनिस फलंदाजी करत होता. चेन्नईच्या संघाने बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रेहमानच्या खांद्यावर गोलंदाजाची जबाबादारी सोपवली. 6 बॉलमध्ये 17 धावा वाचवण्याचं आव्हान मुस्फिजूरला पेलता आलं नाही. याला कारण ठरली मार्कस स्टॉयनिसची तुफान फटकेबाजी.


> 20 व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर मार्कस स्टॉयनिसने खणखणीत षटकार लगावला. ऑफ स्टम्पच्या बाहेर टाकलेला चेंडू स्टॉयनिसने लाँग ऑनवरुन सीमेपार धाडला.


> 5 बॉलमध्ये 11 धावांची गरज असताना ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर स्टॉयनिसने चौकार लगावला. ऑफ स्टम्पवर टाकलेली फूल लेंथ डिलेव्हरीचा स्टॉयनिसने थेट गोलंदाजाच्या डोक्यावरुन सरळ फटका लगावत समाचार घेतला.


> आता समिकरण झालेलं 4 बॉलमध्ये 7 धावा. मुस्फिजूरने नो बॉल टाकला. मात्र झटपट विजय मिळवण्यासाठी आसुसलेल्या स्टॉयनिसने हा चेंडूही सीमेपार धाडत 4 धावा मिळवल्या. ऑफ स्टम्पच्या बाहेर टाकलेला हा फूलटॉस स्टॉयनिसच्या बॅटची कड घेऊन शॉर्ट थर्डला चौकार गेला. या बॉलवर एकूण 5 धावा मिळाल्या.


> 4 बॉल 3 धावा हव्या असताना स्टॉयनिसने ओव्हरच्या चौथ्या बॉलवर चौकार लगावला. मुस्फिजूरने मिडल आणि लेग स्टम्पवर टाकलेल्या शॉर्ट लेंथ डिलेव्हरीवर स्टॉयनिसने शॉर्ट फाइन लेगवरुन चौकार लगावत सामना जिंकवून दिला.



पाचवा विजय


हा लखनऊच्या संघाचा पाचवा विजय ठरला आहे. आपल्या 8 पैकी 5 सामन्यांमध्ये लखनऊने विजय मिळवला आहे. तर 3 सामने ते पराभूत झाले आङेत. लखऊनबरोबरच दुसऱ्या स्थानी असलेल्या कोलकाता आणि आणि तिसऱ्या स्थानी असलेल्या सनरायझर्स हैदराबादनेही प्रत्येकी 5 सामने जिंकले आहेत. मात्र नेट रनरेटच्या जोरावर हे संघ लखनऊहून वरील स्थानावर आहेत.