Lok Sabha Election 2024: देशासह जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी महत्वाची अपडेट आहे.  लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या तारखा आज जाहीर झाल्या आहेत. देशातील विविध राज्यांमध्ये 7 टप्प्यात लोकसभेच्या निवडणुका होत आहे. निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असतो. तर दरवर्षीचा आयपीएल हंगाम हादेखील जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणीच असते. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या तारखांचा आयपीएलवर परिणाम होणार का? अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत. निवडणुकीमुळे आयपीएल दुसऱ्या देशात खेळवली जाणार का? असेही म्हटले जात आहे. या सर्वावर बीसीसीआयचे अध्यक्ष जय शाह यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशासह जगात लोकप्रिय असलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा 17वा सिझन संपूर्ण भारतात होणार नसल्याच्या बातम्या आल्या होत्या. या स्पर्धेचा दुसरा टप्पा देशाबाहेर खेळवला जाऊ शकतो, अशा आशयाचे वृत्त समाजमाध्यमांतून समोर येत होते. आता बीसीसीआय सचिव जय शाह यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आयपीएल 2024 ही भारतातच होणार आहे. इतर कुठेही जाणार नसल्याचे जय शाह यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे भारतीय क्रिकेट फॅन्सना आनंद झालाय. त्यामुळे आयपीएल 2024 संपूर्णपणे भारतात होणार आहे, हे स्पष्ट झाले आहे. 


जय शहांनी फेटाळल्या चर्चा


16 मार्च रोजी लोकसभा निवडणुकींच्या तारखा जाहीर झाल्या. या तारखा आणि आयपीएलच्या तारखा एकमेकांसोबत क्लॅश होत आहेत. त्यामुळे  बीसीसीआयकडून आयपीएल 2024 चा दुसरा टप्पा यूएईमध्ये आयोजित केला जाऊ शकतो, अशा बातम्या समोर येत होत्या. पण जय शहा यांनी या सर्व अंदाज फेटाळून लावले आहेत. 'नाही, आयपीएल परदेशात हलवली जाणार नाही.' अशा शब्दात जय शहांनी चर्चा फेटाळल्या. क्रिकबझने यासंदर्भात वृत्त दिले आहे. 


सीएसके विरुद्ध बंगळूर मॅचने हंगामाची सुरुवात


निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार देशात 19 एप्रिलपासून मतदान सुरू होऊन 1 जूनपर्यंत चालणार आहे. तर आयपीएल 2024 22 मार्चपासून सुरू होणार आहे. बीसीसीआयने गेल्या महिन्यातच वेळापत्रक जाहीर केले होते. अर्थात, त्यावेळी निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या नव्हत्या. आतापर्यंत केवळ 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. आयपीएलच्या 17 व्या हंगामाची सुरुवात सीएसके विरुद्ध बंगळूरच्या मॅचने होणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात  चेपॉकमध्ये उद्घाटनाचा सामना होणार आहे. IPL 2024 च्या पहिल्या टप्प्यातील शेवटचा सामना 7 एप्रिल रोजी होणार आहे.


लवकरच उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक


आयपीएल मॅनेजमेंट टिमकडून लोकसभा निवडणुकीच्या तारखांमुळे आयपीएलच्या वेळापत्रक थांबवण्यात आले होते. आता लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर बीसीसीआय लवकरच आयपीएल 2024 च्या उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता आहे. आयपीएल 2024 चा अंतिम सामना 26 मे रोजी खेळवला जाण्याची शक्यता आहे. यानंतर अवघ्या आठवडाभरात टी-20 विश्वचषक सुरू होणार आहे.