IPL 2024 : अंपायरशी पंगा घेणं विराट कोहलीला पडलं महागात, बीसीसीआयने सुनावली शिक्षा
IPL 2024 : आयपीएलमध्ये रविवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुदरम्यान सामना रंगला. शेवटच्या चेंडूपर्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात कोलकाताने अवघ्या एका धावेने बंगळुरुवर विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहलीच्या बाद होण्यावरुन चांगलाच वाद रंगला होता.
Virat Kohli Fined, IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये 36 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) दरम्यान चुरशीचा सामना रंगला. शेवटच्या चेंडूपर्यंत उत्सुकता ताणून धरलेल्या या सामन्यात कोलकाताना बंगळुरुवर अवघ्या एका धावेने विजय मिळवला. आठ सामन्यातील बंगळुरुचा हा सातवा पराभव ठरला. या पराभवामुळे बंगळुरुचं प्ले ऑफमधलं स्थान जवळपास संपुष्टात आलं आहे. हे कमी काय बंगळुरुला आता आणखी एक धक्का बसला आहे. बंगळुरुचा स्टार फलंदाज विराट कोहलीला (Virat Kohli) शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
विराट कोहलीला शिक्षा
कोलकाताविरुद्धच्या सामन्यात बाद झाल्यानंतर विराट कोहली चांगलाच संतापला आणि त्याने थेट मैदानावरील अंपयारशी पंगा घेतला. भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) हे प्रकरण गांभीर्याने घेतलं असून विराट कोहलीला मोठी शिक्षा सुनावली आहे. विराटला मॅच फीच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. विराटला बीसीसीआयने आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवलं असून त्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे.
विराट कोहली संतापला
कोलकाता नाईट रायडर्सने पहिली फलंदाजी करत बंगळुरुसमोर 223 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. याला उत्तर देताना बंळुरुने दमदार सुरुवात केली. कोहलीने 7 चेंडूवर 18 धावा केल्या. सामन्याच्या तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कोलकाताचा वेगलान गोलंदाज हर्षित राणाने कोहली कमरेच्या वर फुलटॉस टाकला. ज्यावर फटका मारण्याच्या नादात कोहली कॅच आऊट झाला. अंपायरने विराटला बाद घोषित केलं. पण कोहलीला अंपयारचा हा निर्णय मान्य झाला नाही. त्याने DRS घेतला.
विराट कोहलीने रिव्ह्यू मागितल्यानंतर टीव्ही अंपायरलने हॉक आय सिस्टिमची मदत घेतली. यात कोहली क्रिझ सोडून थोडा पुढे आल्याचं पाहायला मिळाला. त्यामुळे टीव्ही अंपायरने बादचा निर्णय कायम ठेवला. निर्णय विरोधात गेल्याने विराट कोहली चांगलाच संतापला. त्याने भर मैदानात अंपायरशी वाद घातला. बंगळुरुचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने ही कोहलीची बाजू घेत अंपायरशी चर्चा केली. पण विराटला पॅव्हेलिअनमध्ये परतावं लागलं. पॅव्हेलिअनमध्ये परतताना कोहलीने रागाने बॅट जमिनीवर आदळली.
त्यानंतर डस्टबिनलाही त्याने जोरदार मुक्का मारला. यावेळी कोहलीच्या हातातील ग्लोव्हजही खाली पडला. ड्रेसिंग रुममध्येही विराटच्या चेहऱ्यावरील संताप जाणवत होता. पण विराटचा हाच संताप बीसीसीआयला रुचला नाही. बीसीसीआयने विराटला समज देत आर्थिक दंड ठोठावलाय. विराटला मॅच फीची 50 टक्के रक्कम बीसीसीआयकडे जमा करावी लागणार आहे.