IPL 2204 : आयपीएलच्या नव्या हंगामातील सर्वात मोठी घडामोड म्हणून ज्याकडे पाहिलं जात होतं, त्यावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. नव्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे मुंबई इंडियन्समधून रोहित शर्मा (Rohit Sharma) पर्वाचा अस्त झाला आहे. मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी आता हार्दिक पांड्याच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. आयपीएलच्या नव्या हंगामासाठी 19 डिसेंबरला खेळा़डूंचा लिलाव होणार आहे. त्याआधी ही मोठी घडामोड घडली आहे. काही दिवसांपूर्वीच हार्दिक पांड्या (Hardik Pandya) गुजरात टायटन्समधून मुंबईत इंडियन्समध्ये परतला होता. त्याचवेळी हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवणार याचा कयास लावला जात होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्मा पर्वाचा अस्त
रोहित शर्मा 2013 पासून मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद सांभाळतोय. गेल्या दहा वर्षात आयपीएलमधल्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक रोहित शर्मा आहे. पण एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेतील पराभवानंतर आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या कर्णधारपदाबाबत मोठा निर्णय होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जात होता. अखेर हा अंदाज खरा ठरलाय.


मुंबई इंडियन्सचं निवेदन
मुंबई इंडियन्सने निवदेन जारी करत हार्दिक पांड्याच्या नावाची कर्णधारपदी घोषणा केली आहे. यात मुंबई इंडियन्सचा ग्लोबल हेड महेला जयवर्धने यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई इंडियन्सला सचिनपासून हरभजनपर्यंत आणि रिकी पासून रोहितपर्यंत नेहमीच असाधारन नेतृत्व लाभलं आहे. मुंबई इंडियन्सच्या यशात योगदान देण्याबरोबरच या सर्वांनी भविष्यात संघ मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले. आता ही जबाबदारी हार्दिक पांड्यावर सोपवण्यात आली असून आयपीएल 2024 साठी मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपद हार्दिक पाड्या सांभाळेल. असं महेला जयवर्धने यांनी या निवेदनात म्हटलं आहे. 


मुंबई इंडियन्सने आयपीएल 2024 लिलावापूर्वीच गुजरात टायटन्समधून हार्दिक पांड्याला 15 कोटी रुपयांच्या फूल कॅश ट्रेड केलं होतं. तेव्हापासूनच हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदाबाबत चर्चा रंगली होती. अखेर यावर मुंबई इंडियन्सने शिक्कामोर्तब केलं आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने पहिल्यात हंगामत जेतेपद पटाकवलं होतं. तर दुसऱ्या हंगामात फायनलपर्यंत धडक मारली होती. हार्दिक पांड्याच्या आयपीएलमधल्या दमदार कामगिरीमुळे त्याला टीम इंडियाच्या टी20 संघाचंही कर्णधारपद सोपवण्यात आलंय. 



हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात नवा अध्याय
भविष्याच्या दृष्टीकोनात मुंबई इंडियन्सने हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स आयपीएलमध्ये नव्या अध्यायाला सुरुवात करेल. रोहित शर्माच्या भविष्याबाबत अद्याप कोणताही निर्णय जारी करण्यात आलेला नाही. पण रोहित शर्मा खेळाडू म्हणून मुंबई इंडियन्समधून खेळत राहिल असं बोललं जात आहे. 


आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ
मुंबई इंडियन्स हा आयपीएल इतिहासतील सर्वात यशस्वी संघ आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने तब्बल पाच वेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. तर 10 वेळा प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. मुंबई इंडियन्सनं पहिलं जेतेपतद 2013 मध्ये मिळवलं होतं. त्यानंतर 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं.