IPL 2024 : आयपीएलचं पाचवेळा जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) सतराव्या हंगामाची सुरुवात फारशी समाधानकराक झालेली नाही. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सला सलग दोन पराभवाला सामोरं जावं लागलं. पहिल्या सामन्यात शुभमन गिलच्या गुजरात टायटन्सने मुंबईवर मात केली. तर दुसऱ्या सामन्यात पॅट कमिन्सच्या सनरायजर्स हैदराबादने अतिशय वाईट पद्धतीने मुंबई इंडियन्सला धुळ चारली. सलग दोन पराभवामुळे आयपीएल पॉईंटटेबलमध्ये मुंबई इंडियन्स नवव्या क्रमांकावर आहे. हे कमी की काय मुंबई इंडियन्ससाठी आता आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई इंडियन्सला बसणार फटका
मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) पुढचे आणखी काही सामने खेळू शकणार नाही. टी20 स्पेशलिस्ट असलेल्या सुर्यकुमार यादवची काही दिवसांपूर्वी स्पोर्ट्स हार्निया सर्जरी झाली होती. यातून तो अद्याप पूर्णपणे बरा झालेला नाही. फिटनेस टेस्टमध्येही सूर्यकुमार यादव पास होऊ शकला नव्हता. त्यामुळे एनसीएने सूर्यकुमार यादवला खेळण्याची परवानगी दिलेली नाही. पहिल्या दोन सामन्यात सुर्या खेळू शकला नव्हता. पण आता पुढच्या आणखी काही सामन्यातही त्याला खेळता येणार नाहीए. मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन करण्यासाठी सूर्याला आणखी काही काळ लागणार आहे. 


फिट नसतानाही सूर्यकुमारला आयपीएलमध्ये खेळवण्याचा धोका बीसीसीआयला घ्यायचा नाहीए. कारण आयपीएल संपल्यानंतर लगेचच म्हणजे जून महिन्यात टी20 विश्वचषक खेळवला जाणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेपूर्वी सूर्यकुमार पूर्णपणे तंदरुस्त होणं गरजेचं आहे. टीम इंडियाचा तो महत्वाचा खेळाडू आहे. 


नमन धीरला संधी
सूर्यकुमार यादवच्या गैरहजेरीत मुंबई इंडियन्समध्ये पंजाबचा आक्रमक फलंदाज नमन धीरलला संधी देण्यात आली आहे. डाव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या नमनने पहिल्या दोन सामन्यात दमदार कामगिरी केली आहे. दोन सामन्यात नमनने 50 धावा केल्यात. पण सूर्यकुमारची संघात एन्ट्री झाल्यास नमन धीरची सुट्टी होण्याची शक्यता आहे. मुंबई इंडियन्सचा तिसरा सामना सोमवारी म्हणजे 1 एप्रिलला होम ग्राऊंड मुंबईत होणार आहे. मुंबई इंडियन्स राजस्थान रॉयलशी दोन हात करेल.


सूर्यकुमार यादवची आयपीएलमधली कामगिरी
सूर्यकुमार यादवने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली आहे. सूर्यकुमार यादवने 139 सामन्यात तब्बल 3249 धावा केल्या आहेत. यात त्याने एक शतक आणि तब्बल 21 अर्धशतकं केली आहेत. 103 ही त्याची आयपीएलमधली सर्वोत्तम धावसंख्या आहे.