IPL 2024: आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचा संघ सलग तीनवेळा हरुनसुद्धा चर्चेत आहे. हार्दिक पांड्याची कॅप्टन्सी, रोहित शर्माबद्दलच चाहत्यांचं प्रेम आणि आयपीएलमध्ये दबदबा असलेल्या मुंबई इंडियन्सची हाराकिरी यामागचा इतिहास,कारणे शोधण्याचा प्रयत्न केला जातो. पण या सर्वामागे नेमकं काय चाललंय? जाणून घेऊया. मुंबई इंडियन्समध्ये असताना हार्दिक पांड्या लोकांनी डोक्यावर उचललं. त्यानंतर तो गुजरात टायटन्सचे नेतृत्व करु लागला. तेव्हा मुंबईचे चाहते थोडे नाराज झाले पण तरीही काही अडचण नव्हती. पण आता मुंबई टीममध्ये रोहित शर्मा असताना कॅप्टन म्हणून आलेला पांड्या चाहत्यांच्या पचनी पडला नाही.  चांगली टीम, कॅप्टन्सी, महागडा खेळाडुचा टॅग असं सर्वकाही पांड्याकडे आहे. पण चाहत्यांचं प्रेम? हे त्याला अजून अद्याप जिंकता आलं नाहीय. पांड्यासारख्या बहुआयामी खेळाडूसाठी हे अशक्य नाहीय. यासाठी त्याला पुढच्या चांगल्या खेळाची वाट पाहावी लागणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणाऱ्या हार्दिकच्या कॅप्टन्सीत कोणतीही धार दिसत नाहीय. प्रेक्षकांचे प्रचंड दडपण आणि जणू संपूर्ण क्रिकेट जगतच त्याच्यावर नाराज आहे. स्टेडियममध्ये बसलेले चाहते पांड्याला पाहून 'बू...' करतायत. सोशल मीडियावर लोक मिम्स बनवतायत. या सर्वात मुंबईने सलग तिसरा सामना गमावला. चेन्नईच्या टीममध्ये महेंद्रसिंह धोनीने ऋतुराज गायकवाडकडे अलगदपणे नेतृत्व दिले. पण मग रोहित शर्माकडून हार्दिककडे नेतृत्व गेल्यावर तसा पाठींबा का मिळत नाही? हा प्रश्न पडतोच.


रोहित शर्माला कशी वागणूक मिळतेय?


सलामीच्या सामन्यात हार्दिक पांड्याने रोहित शर्माला बॉण्ड्री लाईनवर उभे केले हे साऱ्या जगाने पाहिले. हाताच्या इशाऱ्याने तो रोहितला इकडे तिकडे मैदानावर धावायला लावताना दिसला. आता मी कर्णधार आहे, असं तो आपल्या कृतीतून दाखवून देत होता. रोहित शर्माने कधीच सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण केले नाही.  तो नेहमी वर्तुळाच्या आत किंवा स्लिपमध्ये उभा असतो. गोलंदाजाला मार्गदर्शन करत राहतो. संघाचे मनोबल उंचावत असतो. पण हार्दिकची ती कृती चाहत्यांच्या संतापात भर टाकणारी होती. हैदराबादविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात हार्दिकला अधिक दडपण जाणवू लागले. यावेळी रोहित शर्मा पुढे सरसावला. त्याने काही काळ कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे रोहित शर्माचा सहकार्य करत नाही, असे म्हणणे चुकीचे ठरेल. 


चांगली सुरुवात गरजेची 


मुंबई इंडियन्स आपल्या दमदार बॅटींग ऑर्डरसाठी ओळखली जाते. त्यामुळे सुरुवात दमदार होणे गरजेचे आहे. हार्दिक पांड्या खूप चांगला फिनिशर आहे. पण सध्या त्याला टाईम साधता येत नाहीय. तो जुळून आल्यास तो टीकाकारांना गप्प करु शकतो. रोहित शर्माच्या अनुभवाचा आणि लोकप्रियतेचा हार्दिक पांड्याने टीमसाठी फायदा करुन घ्यायला हवा. कॅप्टन्सी बदलून टीमला फायदा होणार असेल तर टीम मॅनेजमेंटने यावर नक्की विचार करायला हवा, असे मत चाहते व्यक्त करत आहेत.