आयपीएलने अखेर अधिकृतपणे गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स संघात परतल्याची घोषणा केली आहे. हार्दिक पांड्याला ट्रेड करण्यासाठी गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स संघात बोलणी सुरु होती. रविवारी गुजरातने संघाची घोषणा केली तेव्हा हार्दिक पांड्यालाही स्थान दिल्याने तो संघात कायम राहणार असल्याचं दिसत होतं. पण सोमवारी हार्दिक पांड्या मुंबईत परतत असल्याचं स्पष्ट झालं. हार्दिक पांड्याने मागील दोन हंगामात गुजरात संघाचं नेतृत्व करताना जबरदस्त यश मिळवून दिलं होतं. 2022 मधील आपल्या पहिल्या हंगामात गुजरातने आयपीएल जिंकली, तर दुसऱ्या हंगामात उप-विजेते ठरले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या ट्रेडवर बोलताना गुजरात टायटन्सचे क्रिकेट संचालक विक्रम सोलंकी म्हणाले आहेत की, "हार्दिक पांड्याने गुजरात संघाचं नेतृत्व करताना दोन्ही हंगामात उत्कृष्ट कामगिरी केली. पहिल्या हंगामात त्याने आयपीएल चॅम्पिअनशिप जिंकवून दिली आणि दुसऱ्यात अंतिम फेरी गाठली. त्याने आता आपला मूळ संघ मुंबई इंडियन्सकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आम्ही त्याच्या निर्णयाचा आदक करतो आणि भविष्यासाठी शुभेच्छा देतो".



अंबानी कुटुंबाची प्रतिक्रिया


हार्दिक पांड्या मुंबई संघात परतल्यानंतर मुंबई इंडियन्सचा सह-मालक आकाश अंबानीने म्हटलं आहे की, "हार्दिकला मुंबईत संघात परत पाहणं मला फार आनंदी करणारं आहे. ही आनंदी घरवापसी आहे. हार्दिक ज्या कोणत्याही संघात खेळतो त्याला एक संतुलन देतो. हार्दिकचा मुंबई इंडियन्स कुटुंबासोबतचा पहिला कार्यकाळ फार यशस्वी होता. दुसऱ्या कार्यकाळात तो आणखी यश मिळवेल अशी आशा आहे".




नीता अंबानी यांनी म्हटलं आहे की, "हार्दिकचं पुन्हा त्याच्या घऱी मुंबईत स्वागत करताना आम्ही आनंदी आहोत. आमच्या मुंबई इंडियन्स कुटुंबासोबत हे हृदयस्पर्शी पुनर्मिलन आहे. मुंबई इंडियन्सचा एक तरुण प्रतिभावंत खेळाडू ते टीम इंडियाचा स्टार होईपर्यंत, हार्दिकने खूप पुढपर्यंत मजल मारली आहे. त्याच्यासाठी आणि मुंबई इंडियन्ससाठी भविष्यात काय वाढून ठेवलं आहे याबद्दल आम्ही उत्सुक आहोत".



हार्दिक पांड्या मुंबई संघात परतल्याने आता रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, ईशान किशन यांच्यासह संघाच्या ताफ्यात आणखी एक दमदार खेळाडू सामील झाला आहे. हार्दिक पांड्या सर्वात आधी 2016 मध्ये मुंबई इंडियन्ससाठी खेळला होता. 2015 ते 2021 दरम्यान त्याने संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला.