IPL 2024 Points Table After CSK Vs LSG: इंडियन प्रिमिअर लीगच्या 39 व्या सामन्यात 210 धावांचा डोंगर उभारुनही चेन्नई सुपर किंग्जच्या हाती निराशाच लागली. मार्कस स्टॉयनिसने केलेल्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर 3 बॉल 6 विकेट्स राखून लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाने स्पर्धेमधील आपला पाचव्या विजयाची नोंद केली. चेन्नईच्या संघाला यंदाच्या पर्वात लखनऊ सुपर जायंट्सने दुसऱ्यांदा पराभावाचा धक्का दिला. आधी आपल्या होम ग्राऊण्डवर लखनऊनने चेन्नईला पराभूत केलं अन् मंगळवारी के. एल. राहुलच्या नेतृत्वाखालील या संघाने चेपॉकच्या घरच्या मैदानावर चेन्नईला धूळ चारण्याचा पराक्रम केला. या सामन्याच्या अनपेक्षित निकालामुळे पॉइण्ट्स टेबलमध्ये टॉप पाच संघांच्या क्रमवारीत मोठी उलथापालथ झाली आहे. विशेष म्हणजे 74 पैकी 39 व्या सामन्यानंतर म्हणजेच अर्ध्याहून अधिक सामने संपल्यानंतर एक संघाचं प्लेऑफमधील तिकीट जवळपास निश्चित झाला आहे. हा संघ कोणता आहे आणि कोणती टीम कोणत्या स्थानावर आहे पाहूयात...


चेन्नईच्या पराभवामुळे काय घडलं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नईला पराभूत केल्याने लखनऊच्या संघाने चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. या पराभवामुळे चेन्नईचा संघ एक स्थानी खाली घसरुन पाचव्या स्थानी आला आहे. सध्या लखनऊचा संघ 8 सामन्यांपैकी 5 विजयांसहीत चौथ्या स्थानी आहे. तर चेन्नईची कामगिरी त्यांच्या 8 सामन्यांमध्ये 50-50 राहिली आहे. म्हणजेच त्यांनी 4 सामने जिंकलेत तर 4 मध्ये त्यांचा पराभव झाला आहे. 


तळाला कोणते संघ?


तळाच्या संघांबद्दल बोलायचं झाल्यास सहाव्या स्थानी चार विजय आणि चार पराभवांसहीत गुजरातचा संघ आहे. नेट रनरेटच्या जोरावर चेन्नई गुजरातहून एक स्थान वर आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाला 8 सामन्यांपैकी केवळ 3 मध्ये विजय मिळवता आला आहे. अशीच स्थिती दिल्लीचीही आहे. अनेक सामन्यांमध्ये अगदी विजयाच्या जवळ येऊन पराभूत झाल्याने पंजाबचा संघ 8 पैकी 6 पराभवांसहीत नवव्या स्थानी आहे. तर केवळ एक सामना जिंकणारा बंगळुरुचा संघ पॉइण्ट्स टेबलमध्ये तळाशी आहे.


अव्वल संघ कोणते?


पॉइण्ट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी सनरायझर्स हैदराबादचा संघ आहे. त्यांनी 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत. तर दुसऱ्या स्थानी असलेल्या कोलकात्यानेही अशीच कामगिरी केली असली तरी त्यांचा नेट रन रेट अधिक असल्याने ते दुसऱ्या स्थानी आहे. 


नक्की पाहा >> 6 बॉलमध्ये 17 रन हवे असताना 3 बॉलमध्येच जिंकली LSG! पाहा Video नक्की घडलं काय 


हा संघ जवळपास प्लेऑफसाठी पात्र ठरलाय


यंदाच्या पर्वात अगदीच अनपेक्षितरित्य उत्तम कामगिरी करत सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारा संघ पॉइण्ट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी आहे. हा संघ म्हणजे संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणारा राजस्थान रॉयल्सचा संघ! राजस्थानने आपल्या 8 पैकी 7 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. राजस्थानच्या संघाचे एकूण 14 पॉइण्ट्स असून त्यांच्या इतके सामने कोणीही जिंकलेले नाहीत. दुसऱ्या स्थानी असलेल्या कोलकात्याच्या संघाने 5 सामने जिंकले आहेत. राजस्थानचं प्लेऑफमधलं स्थान जवळपास निश्चित मानलं जात आहे. सामान्यपणे 8 सामने जिंकणारा संघ टॉप 4 मध्ये राहून प्लेऑफसाठी पात्र ठरतो. राजस्थानला 8 विजयांसाठी केवळ एका विजयाची आवश्यकता आहे. आपल्या उरलेल्या 8 सामन्यांपैकी राजस्थान हा किमान आवश्यक असलेला एक सामना नक्कीच जिंकेल यात शंका नाही.



सध्याची स्थिती पाहता कोणताही संघ अद्याप अधिकृतरित्या स्पर्धेबाहेर पडलेला नाही. मात्र यंदाच्या पर्वात प्लेऑफसाठी पात्र ठरणारा पहिला संघ राजस्थानचाच ठरेल असं चित्र सध्या दिसत आहे.