IPL 2024 : आयपीएलच्या प्रत्येक हंगामात काही खेळाडू आपली छाप उमटवतात. आयपीएलने आतापर्यंत टीम इंडियाला (Team India) अनेक प्रतिभावान खेळाडू दिलेत. यंदाच्या सतराव्या हंगामातही आयपीएलमध्ये युवा खेळाडूंनी आपली छाप उमटवली आहे. अभिषेक शर्मा, मयंक यादव, शशांक सिंह, आशुतोष शर्मा अशा युवा खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला आहे. यापैकीच एक खेळाडू म्हणजे आशुतोष शर्मा (Ashutosh Sharma). पंजाब किंग्सकडून खेळणाऱ्या आशुतोषने तुफानी फटकेबाजी करत गुजरातविरुद्धचा सामना जिंकून दिला होता. पण आता आशुतोषने एक धक्कादायक खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशुतोषचा प्रशिक्षकावर गंभीर आरोप
गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात शशांक सिंहसोबत भागिदारी करत 25 वर्षांच्या आशुतोषने संघाला यादगार विजय मिळवून दिला. या सामन्यानंतर आशुतोषची चांगलीच चर्चा रंगली आहे. आशुतोष शर्मा कोण आहे? कोणत्या राज्यातून खेळतो याबद्दल गुगलवर सर्च केलं जात आहे. आशुतोष यंदा पहिल्यांदाच आयपीएल खेळतोय. स्थानिक क्रिकेटमध्ये तो रेल्वेसाठी खेळतो आणि त्याआधी मध्य प्रदेश संघासाठी खेळत होता. तीन वर्षांपूर्वी आशुतोषने मध्य प्रदेश सोडण्याचा आणि रेल्वेकडून खेळण्याचा निर्णय घेतला. यामागे सर्वात मोठं कारण होतं, ते म्हणजे त्यावेळचे संघाचे प्रशिक्षक. 


'प्रशिक्षकाने संघाबाहेर काढलं'
आशुतोष शर्माने दिलेल्या एका मुलाखतीत प्रशिक्षकावर गंभीर आरोप केला आहे. 2019 मध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या शेवटच्या टी20 सामन्यात आशुतोषने 84 धावांची खेळी केली. या स्पर्धेनंतर संघात मोठे बदल झाले. एका दिग्गज प्रशिक्षकाकडे मध्य प्रदेश रणजी संघाची जबाबदारी सोपवण्यात आली. या प्रशिक्षकाचं नाव होतं चंद्रकांत पंडित (Chandrakant Pandit). चंद्रकांत पंडित यांनी संघात अनेक बदल करण्याचा निर्णय घेतला. संघ निवड करण्यासाठी सामने खेळवण्यात आले. यात आशुतोषने 90 धावा केल्या. पण ज्यावेळी प्लेईंग इलेव्हन जाहीर झालं त्यात आशुतोषचं नाव नव्हतं.


हा तो काळ होता ज्यावेळी कोरोनामुळे क्रिकेट पूर्णपणे बदललं होतं. खेळाडूंना हॉटेलमध्ये बायोबबमध्ये राहावं लागत होतं. आशुतोष केवळ संघाबरोबर प्रवास करत होता आणि हॉटेलमध्या राहात होता. जिममध्ये ट्रेनिंगही करत होता, पण त्याला प्रशिक्षकांने खेळण्याची एकही संधी दिली नाही. यामुळे आशुतोष नैराश्यात गेला. यानंतर त्याने मध्य प्रदेश रणजी संघ सोडण्याचा निर्णय घेतला. आणि तो रेल्वेसाठी खेळू लागला.


आशुतोष शर्माने प्रशिक्षकाचं नाव घेतलं नसलं, तरी 2019 मध्ये चंद्रकांत पाटील हे मध्य प्रदेशचे क्रिकेट संघाचे प्रशिक्षक होते. चंद्रकांत पाटील यांना कठोर नियमांसाठी आणि शिस्तीसाठी ओळखलं जातं. चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडू तयार झालेत. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मध्यप्रदेशने पहिल्यांदा रणजी ट्रॉफीवर नाव कोरलं होतं.