IPL 2024 CSK New Captain: आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात पहिला सामना होणार आहे. पण पहिल्या सामन्याआधीच चेन्नई सुपरकिंग्जने मोठा निर्णय घेतला आहे. महेंद्रसिंह धोनीच्या जागी ऋतुराज गायकवाडला कर्णधारपदी नियुक्त करण्यात आलं आहे. ऋतुराज गायकवाडने कर्णधारपदाबाबतच्या बैठकीला हजेरी लावली होती. त्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. याआधी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरुन हटवत चाहत्यांना धक्का दिला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नईने प्रसिद्धीपत्रक जारी करत ऋतुराज गायकवाड आगामी हंगामात कर्णधार असेल याची अधिकृत माहिती दिली आहे. यात सांगण्यात आलं आहे की, "आगामी आयपीएल 2024 साठी महेंद्रसिंह धोनीने चेन्नईचं कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे सोपवलं आहे. 2019 पासून ऋतुराज चेन्नई संघाचा महत्त्वाचा भाग असून त्याने संघासाठी एकूण 52 सामने खेळले आहेत".



आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून महेंद्रसिंग धोनी चेन्नईचा कर्णधार आहे. त्याने संघाला आतापर्यंत पाचवेळा आयपीएलचं जेतेपद मिळवून दिलं आहे. चेन्नईच्या या कामगिरीची बरोबरी फक्त मुंबई इंडियन्स करु शकला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. महेंद्रसिंह धोनीच्या वाढत्या वयामुळे आयपीएलच्या प्रत्येक हंगामात त्याच्या खेळण्याबद्दल शंका व्यक्त केली जाते. सध्याचा हंगाम त्याचा शेवटचा असेल असा अंदाज आहे. दरम्यान मागील हंगामात संघाचं कर्णधारपर रवींद्र जाडेजाकडे सोपवण्यात आलं होतं. पण त्याला फारसं यश मिळत नसल्याने पुन्हा एकदा धोनीकडेच नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. यावरुन दोघांमध्ये वाद झाल्याचीही चर्चा होती. 


ऋतुरात गायकवाडने भारतीय संघातून 6 एकदिवसीय आणि 19 टी-20 सामने खेळले आहेत. 2020 मध्ये त्याने चेन्नई संघात पदार्पण केलं. चेन्नईकडून आतापर्यंत त्याने 52 सामने खेळले आहेत. त्याने 16 सामन्यांत 147.50 च्या प्रभावी स्ट्राइक रेटने एकूण 590 धावा केल्या होत्या.


धोनीने 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 मध्ये चेन्नईचं नेतृत्व करताना पाच आयपीएल विजेतेपदे मिळविली आहेत. महेंद्रसिंह धोनीची गणना सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते. धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने टी-20 वर्ल्डकप 2007, एकदिवसीय वर्ल्ड कप 2011 आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 देखील जिंकली आहे. 


धोनीने एकूण 250 आयपीएल सामने खेळले आहेत. 2016 ते 2017 या कालावधीत तो रायजिंग पुणे सुपरजायंट संघासह होता. या सामन्यांमध्ये त्याने 38.79 च्या सरासरीने 5,082 धावा केल्या आहेत. त्याने 24 अर्धशतकेही झळकावली आहेत. त्याने एकूण 142 झेल घेतले असून 42 स्टंपिंग केले आहेत.


कसा असेल चेन्नईचा संघ?


एमएस धोनी (क), मोईन अली, दीपक चहर, तुषार देशपांडे, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, अजिंक्य रहाणे, शेख रशीद,  निशांत सिंधू, प्रशांत सोलंकी, महेश थेक्षाना, रचिन रवींद्र, शार्दुल ठाकूर, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, मुस्तफिजुर रहमान, अवनीश राव अरवेल्ली.