Dinesh Karthik Helmet: 2024 च्या IPL च्या हंगामात रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरू (RCB) या संघाकडून खेळणाऱ्या दिनेश कार्तिकनं सुरुवातीपासूनच त्याच्या खेळाच्या जीवावर यंदाचं पर्व गाजवल्याचं पाहायला मिळालं. अद्यापही आरसीबीच्या संघाची आयपीएलमधील वाटचाल सुरु असून, या संघाकडून क्रिकेटप्रेमींच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलमध्ये सुरुवातीपासूनच प्रभावी कामगिरी करणाऱ्या दिनेश कार्तिकनं नुकत्याच पार पडलेल्या हैदराबादविरोधातील सामन्यातही 35 चेंडूंमध्ये 83 धावांची खेळी केली. यामध्ये त्याच्या या खेळीव्यतिरिक्त सर्वाधिक लक्ष वेधलं ते म्हणजे त्याच्या आगळ्यावेगळ्या हेल्मेटनं. डीके इतर खेळाडूंपेक्षा आकारानं वेगळं असणारं हेल्मेट वापरतो. पण, तो असं का करतो माहितीये? फक्त फलंदाजीच्याच वेळी नव्हे तर, Wicket Keeping करतानाही तो असंच हेल्मेट वापरतो. 'माइंड 2.0' असं त्याच्या हेल्मेटचं नाव. क्रिकेट विश्वामध्ये कुमार संगकारा आणि राहुल त्रिपाठी हे फलंदाजही असंच हेल्मेट वापरतात. जिथं इतर खेळाडूंच्या हेल्मेटचं वजन 1 ते 1.25 किलो असतं तिथं हे अनोखं हेल्मेट अवघं 800 ग्रॅम वजनाचं असतं. 


हेल्मेटचं वजन कमी असल्या कारणानं खेळाडूला अतिशय सहजपणे फलंदाजी किंवा क्रिकेटच्या मैदानावरील खेळाचं प्रदर्शन करता येतं. वजनाप्रमाणं या हेल्मेटची किंमतही कमी असल्याचं म्हटलं जातं. दिनेश कार्तिक गेल्या अनेक दिवसांपासून अशाच हेल्मेटचा सातत्यानं वापर करताना दिसत आहे. त्याच्या फलंदाजीची एकंदर शैली पाहता या हेल्मेटमुळं त्याला खेळपट्टीवर चांगलीच मदतही होताना दिसते. 


एक नजर कार्तिकच्या कामगिरीवर 


यंदाच्या आयपीएल पर्वामध्ये डीकेनं कमाल खेळीचं प्रदर्शन केलं आहे. 14 सामन्यांमध्ये त्यानं 39.38 सरासरीनं 195.65 च्या स्ट्राईक रेटसह 315 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 अर्धशककं, 26 चौकार, 22 षटकारांचा समावेश आहे. बंगळुरूच्या संघाच कार्तिक फलंदाजीच्या शेवटच्या फळीमध्ये येऊन संघाला दमदार शेवटही देऊन जातो. आता संघाच्या उर्वरित सामन्यात तो नेमकी कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.