Rinku Singh Statment on IPL 2025 Mega Auction : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचा अठरावा (IPL 2025) हंगाम सुरु होण्यासाठी बराच अवधी बाकी आहे. नव्या हंगामाआधी आयपीएलचा मेगा ऑक्शन (Mega Auction) पार पडणार आहे. पण त्याआधी डावखूरा आक्रमक फलंदाज रिंकू सिंगच्या (Rinku Singh) एका वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे. आयपीएलमध्ये रिंकू सिंग कोलकाता नाईट रायडर्समधून खेळतो. केकेआरचा (KKR) तो महत्त्वाचा खेळाडू आहे. आयपीएल 2023 मध्ये रिंकूने अनेक सामने केकेआरला एकहाती जिंकून दिलेत. गेल्या म्हणजे आयपीएल 2024 हंगामातही रिंकूने दमदार कामगिरी केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिंकूच्या वक्तव्याने खळबळ
आयपीएलच्या नव्या हंगामापूर्वी मेगा ऑक्शन पार पडणार आहे. त्याआधीच रिंकू सिंगने एक मोठं वक्तव्य केलं आहे. मेगा ऑक्शनआधी कोलकाता नाईट रायडर्सने आपल्याला रिलीज केलं, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमधून (RCB) खेळायला आपल्याला आवडेल असं रिंकू सिंहने म्हटलं आहे. स्पोर्ट्स तकला दिलेल्या एका मुलाखतीत रिंकू सिंगने याचा खुलासा केला आहे. आयपीएल 2025 साठी मेगा ऑक्शन होणार असून केकेआरने रिलीज केलं तर आरसीबीतून खेळणं आपली इच्छा आहे असं रिकूने या मुलाखतीत म्हटलंय. रॉयल चॅलेंजर्स ऑफ बंगळुरुमधून खेळण्याचं मोठं कारण म्हणजे या संघात विराट कोहली आहे, असंही रिंकूने म्हटलं आहे. 


डावखुऱ्या रिंकू सिंग 18 ऑगस्ट 2023 साली डबलिनमध्ये आयर्लंडविरुद्ध भारतासाठी पहिला सामना खेळला.  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रिंकू सिंगने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. आपल्या पोस्टमध्ये रिंकूने म्हटलंय 'स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याला एक वर्ष पूर्ण झालं, निळ्या रंगात खेळलेल्या प्रत्येक क्षणासाठी मी आभारी आहे, जय हिंद' असं रिंकूने म्हटरलंय. 


टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत रिंकू सिंग टीम इंडियाचा राखीब खेळाडू म्हणून सहभागी होता. या स्पर्धेनंतर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या श्रीलंकाविरुद्धच्या टी20 मालिकेतही रिंकू सिंगला टीम इंडियाच संधी देण्यात आली होती. आता रिंकू यूपी टी20 लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. या लीगमध्ये रिंकू मेरठ मावेरिक्स संघाचं नेतृत्व करणार आहे. 25 ऑगस्टपासून या लीगला सुरुवात होणार असून सलामीचाच सामना रिंकू सिंगच्या संघाचा आहे. 


रिंकूची आयपीएल कारकिर्द
रिंकू सिंगची आयपीएल कारकिर्द दमदार आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत तो 45 सामने खेळलाय, यात त्याने 893 धावा केल्यात. यात चार अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएल 2024 मध्ये रिंकूने 168 धावा केल्या होत्या. तर 2023 चं आयपीएल रिंकून गाजवलं. या हंगामात रिंकूने तब्बल 474 धावा कुटल्या. 2024 च्या आयपीएलमध्ये केकेआरने जेतेपद पटकावलं होतं.