आयपीएल 2025 लिलावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने अद्याप फ्रँचाईजीसाठी रिलीज आणि रिटेंशन गाईडलाईन्स जारी केलेल्या नाहीत. दरम्यान काही संघांनी आधीच काही निर्णय घेतल्याचं समजत आहे. बीसीसीआय राईट टू मॅचसह आयपीएल फ्रँचायझींना सध्या जो संघ आहे त्यातील 6 पेक्षा जास्त खेळाडू ठेवण्यास संमती नाकारण्याची शक्यता आहे. पण काहींना 8 खेळाडू ठेवण्याची परवानगी दिली जाईल अशी आशा आहे. आयपीएलमध्ये महेंद्रसिंग धोनीच्या भवितव्यावरही मोठे प्रश्नचिन्ह आहे. अशा परिस्थितीत चेन्नई सुपरकिंग्ज बीसीसीआयला जुना नियम परत आणण्याची विनंती करु शकतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विविध फ्रँचायझी लिलावापूर्वी संघात कोणत्या खेळडूंना ठेवायचं याचा प्राधान्यक्रम आखत आहेत. परंतु केवळ 5 ते 6 खेळाडूंना परवानगी मिळणे अपेक्षित असल्याने अनेक टॉप खेळाडूंना रिलीज केलं जाऊ शकतं. अशा 5 खेळाडूंबद्दल जाणून घेऊयात ज्यांना मेगा लिलावत संघांकडून रिलीज केलं जाण्याची शक्यता आहे. 


रोहित शर्मा


या यादीत सर्वात पहिलं नाव रोहित शर्माचं आहे. मुंबई इंडियन्स संघात मागच्या मोसमात जे काही झालं ते पाहता रोहित शर्माला संघाने रिलीज केलं तरी आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. रोहित शर्माने अभिषेक नायर झालेला संवाद लीक झाला होता. त्यात रोहित 2024 चा सीझन हा त्याचा शेवटचा होता असं म्हणताना दिसत होता. हार्दिक पांड्या आता फ्रँचायझीचे नेतृत्व करत असल्याने, रोहित आयपीएल 2025 च्या हंगामात नवीन संघाच्या शोधात असण्याची शक्यता आहे.


के एल राहुल


लखनऊ सुपरजायंट्स संघाला नवीन कर्णधाराची गरज आहे हे काही आता लपून राहिलेलं नाही. के एल राहुलची खेळण्याची पद्धत आणि अपयशी नेतृत्व यामुळे त्याच्यावर फार टीका झाली आहे. के एल राहुल आता भारताच्या टी-20 संघाचाही भाग नाही. त्यामुळे के एल राहुल आपला जुना संघ बंगळुरुत परतण्याची शक्यता आहे.


फाफ डू प्लेसिस


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) कर्णधार फाफ डू प्लेसिसने गेल्या मोसमात फार यशस्वी झाला नाही. तो 40 वर्षांचा असून आपली सर्वोत्तम कामगिरी देण्यात अपयशी ठरत आहे. IPL 2025 च्या लिलावाने फ्रँचाईजना नव्याने संघबांधणी करण्याची संधी दिली आहे. बंगळुरु संघनवीन कर्णधार निवडेल आणि फाफ डू प्लेसिसला रिलीज करेल अशी अपेक्षा आहे.


वेंकटेश अय्यर


विजेतेपद पटकावल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्ससमोर संघात कायम ठेवण्यासाठी 5 ते 6 खेळाडूंची निवड करण्याचं आव्हान आहे. सुनील नरेन, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, मिचेल स्टार्क, श्रेयस अय्यर आणि फिल सॉल्ट हे फ्रँचायझीसाठी पसंतीचे पर्याय असू शकतात. त्यामुळे व्यंकटेश अय्यर अडचणीत आहे.


ग्लेन मॅक्सवेल


आयपीएल 2024 सीझनमध्ये बंगळुरुमधील खराब कामगिरीनंतर, ग्लेन मॅक्सवेल देखील बाहेर जाऊ शकतो. फ्रँचायझी ग्लेन मॅक्सवेलवर 14.25 कोटी खर्च करण्यापेक्षा त्याच्या तुलनेत चांगली कामगिरी करु शकेल अशा खेळाडूची निवड करण्यास प्राधान्य देईल. त्यामुळे ग्लेन मॅक्सवेल नव्या संघाच्या शोधात असेल.