जयपूर : आयपीएलच्या १२व्या मोसमासाठीच्या खेळाडूंच्या लिलाव अखेर संपन्न झाला आहे. जयपूरमध्ये झालेल्या या लिलावासाठी आयपीएलच्या आठही टीम सहभागी झाल्या होत्या. आयपीएलच्या लिलावासाठी जवळपास १००३ खेळाडूंनी अर्ज केले होते. पण आयपीएलच्या सगळ्या ८ टीमनी यातल्या ३४६ खेळाडूंची यादी निवडली. लिलावामध्ये मात्र या सगळ्या खेळाडूंवर बोली लागली नाही. यातल्या काही खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला, तर अनेक खेळाडूंच्या पदरी निराशा आली. जयदेव उनाडकट आणि वरुण चक्रवर्थी या दोघांना सर्वाधिक किंमत मिळाली. मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही जयदेव उनाडकट महागडा खेळाडू ठरला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उनाडकटला राजस्थाननं ८.४० कोटी रुपयांना विकत घेतलंय. मागच्या वर्षीही राजस्थानच्या टीमनंचं उनाडकटला ११.५ कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. या लिलावातली सगळ्यात धक्कादायक बोली वरुण चक्रवर्तीवर लागली. टीएनपीएलमध्ये खेळलेल्या वरुण चक्रवर्तीला पंजाबच्या टीमनं ८.४० कोटी रुपयांना विकत घेतलं. वरुण चक्रवर्तीची बेस प्राईज २० लाख रुपये होती. मिस्ट्री स्पिनर म्हणून ओळख असणाऱ्या वरुण चक्रवर्ती वेगवेगळ्या प्रकारचे ७ बॉल टाकू शकतो.


नेहमीप्रमाणे यंदाच्या लिलावातही वेस्ट इंडिजच्या खेळाडूंचं वर्चस्व दिसलं. निकोलास पूरन, कार्लोस ब्रॅथवेट, शिमोरन हेटमायर हा खेळाडूंवर कोट्यवधीच्या घरात बोली लागली. पण इंग्लंडचा सॅम कुरन हा सगळ्यात महागडा परदेशी क्रिकेटपटू ठरला. सॅम कुरनला पंजाबच्या टीमनं ७.२० कोटी रुपयांना विकत घेतलं. अक्सर पटेल ५ कोटी रुपयांना दिल्लीला विकला गेला, तर कार्लोस ब्रॅथवेटला कोलकात्यानं ५ कोटी रुपयांना विकत घेतलं. 


लिलावातले महागडे खेळाडू 


जयदेव उनाडकट- ८.४० कोटी- राजस्थान


वरुण चक्रवर्ती- ८.४० कोटी- पंजाब


सॅम कुरन- ७.२० कोटी- पंजाब


कॉलिन इंग्राम- ६.४० कोटी- दिल्ली


कार्लोस ब्रॅथवेट- ५ कोटी- कोलकाता


अक्षर पटेल- ५ कोटी-दिल्ली


मोहित शर्मा- ५ कोटी- चेन्नई


शिवम दुबे- ५ कोटी- बंगळुरू


मोहम्मद शमी- ४.८ कोटी- पंजाब


प्रभसिमरन सिंग- ४.८ कोटी- पंजाब