IPL Auction 2025 Rahul Dravid Why RR Brought 13 Year Old Vaibhav Suryavanshi: राजस्थान रॉयल्सचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) 13 वर्षीय खेळाडूला संघात सामावून घेण्यासंदर्भातील खुलासा केला आहे. आयपीएल 2025 च्या पर्वापूर्वी पार पडलेल्या मेगा ऑक्शनमध्ये राजस्थानच्या संघाने 30 लाखांच्या बेस प्राइज असलेल्या या खेळाडूसाठी तब्बल 1.10 कोटी रुपये मोजले आहेत. मात्र एवढे पैसे या तरुण खेळाडूवर का मोजले याबद्दल द्रविडने स्पष्टीकरण दिलं आहे. 


30 लाखांचा खेळाडू 1.10 कोटींना घेतला विकत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थान रॉयल्सच्या संघातील वातावरण वैभव सूर्यवंशीचा खेळाडू म्हणून विकास करण्यासाठी फारच उत्तम असेल, असा विश्वास द्रविडने व्यक्त केला आहे. आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये दिल्ली कॅपिटल्सने सर्वात आधी 30 लाखांच्या बेस प्राइजवर वैभवला संघात घेण्यासाठी बोली लावली. त्यानंतर राजस्थानच्या संघाने त्यावर पाच लाखांची भर घालत 35 लाखांची बोली लावली. त्यानंतर दिल्लीने पुन्हा 40 लाखांची बोली लावल्यावर राहुल द्रविड ज्या ऑक्शन टेबलवर बसलेला त्या राजस्थानच्या संघाने थेट 65 लाखांची बोली लावली. त्यावर दिल्लीने 70 लाखांची बोली लावल्यानंतर यामध्ये थेट 40 लाखांची भर घालत राजस्थानने 1.10 कोटींची बोली या 13 वर्षीय मुलावर लावली. अखेर दिल्लीने माघार घेतली आणि हा आयपीएलच्या एतिहासातील सर्वात तरुण खेळाडू राहुल द्रविड प्रशिक्षक असलेल्या राजस्थानच्या संघाचा भाग झाला. 


द्रविडने सांगितलं खरं कारण...


द्रविडने 13 वर्षीय वैभव सूर्यवंशी हा राजस्थानच्या संघामध्ये सहभागी होण्यापूर्वी ट्रायलसाठी आला होता असा खुलासा केला आहे. त्याने केलेल्या कामगिरीवर संघ व्यवस्थापन फार समाधानी होतं. वैभव सूर्यवंशीबद्दल बोलताना द्रविडने या तरुण खेळाडूमध्ये फार छान कौशल्य आहे, असं आवर्जून सांगितलं. "वैभव आमच्याकडे ट्रायल्ससाठी आला होता. आम्ही त्याचा खेळ पाहून फारच समाधानी होतो. मला वाटतं त्याच्याकडे फार छान कौशल्य आहे. त्यामुळेच त्याचा विकास होण्यासाठी संघाचं वातावरण फारच छान असेल असं आम्हाला वाटल्याने आम्ही त्याला संघात समावून घेतलं," असं द्रविडने लिलावानंतर म्हटलं आहे. आयपीएलच्या अधिकृत एक्स हॅण्डलवरुन द्रविडच्या या छोट्याश्या मुलाखतीचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ...



वैभव सूर्यवंशीबद्दल थोडक्यात...


वैभव सूर्यवंशीचा जन्म 27 मार्च 2011 चा आहे. वैभव सूर्यवंशी हा अष्टपैलू खेळाडू आहे. वैभवने बिहारसाठी 5 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. सप्टेंबर 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 दिवसांचे 2 सामने झाले. लाल चेंडूने खेळवण्यात आलेले हे सामने 19 वर्षांखालील संघांचे होते. भारताच्या अंडर-19 संघात वैभव देखील होता. यावेळी त्याने दमदार शतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतलं होतं. वैभवने आतपर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 5 सामने खेळून 100 धावा केल्या असून गोलंदाजी करताना एक विकेटही घेतली आहे.