IPL 2021 Elimintor | बंगळुरु विरुद्ध कोलकाता आमनेसामने, दिल्ली विरुद्ध कोण भिडणार?
आयपीएलच्या 14 व्या मोसमातील एलिमिनेटर सामना (IPL 2021 Elimintor) आज (11 ऑक्टोबर) खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आमनेसामने आहेत.
यूएई : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील एलिमिनेटर सामना (IPL 2021 Elimintor) आज (11 ऑक्टोबर) खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आमनेसामने आहेत. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे. एलिमिनेटर सामना हा साखळी फेरी संपल्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघांमध्ये खेळवण्यात येतो. (ipl eliminator 2021 rcb vs kkr who will win kolkata kinght riders vs royal challengers banglore ipl match preview)
या एलिमिनेटर सामन्यातून विजयी होणारा संघ क्वालिफायर 1 मध्ये पराभूत झालेल्या संघाविरुद्ध म्हणजेच दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध भिडेल. रविवारी 10 ऑक्टोबरला क्वालिफायर 1 सामना खेळवण्यात आला. या सामन्यात चेन्नईने दिल्लीचा 4 विकेट्सने पराभव केला.
दोन्ही कर्णधारांच्या नेतृत्वाचा कस
या एलिमिनेटर सामन्यात बंगळुरुचं नेतृत्व विराट कोहली करणार आहे. तर कोलकाताच्या कर्णधारपदाची जबाबदारी ही इयॉन मॉर्गनच्या खांद्यावर असेल. या 'करो या मरो'च्या सामन्यात विराटच्या 'रन'निती कौशल्यांचं कस लागेल. तर दुसऱ्या बाजूला इयॉनमोर तगडं आव्हान असणार आहे.
विराटने या मोसमानंतर कर्णधारपद सोडणार असल्याचं जाहीर केलंय. विराटने याआधी बंगळुरुला 2016 मध्ये स्वत:च्या कॅप्टन्सीत फायनलपर्यंत पोहचवलं. मात्र तेव्हा पराभवाचा सामना करावा लागला होता.
तर याआधी 2015 आणि 2020 बंगळुरुने प्लेऑफपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे आपल्या नेतृत्वात संघाला विजेतेपद मिळवून शेवट गोड करण्याचा प्रयत्न हा विराटचा असेल.
तर दुसऱ्या बाजूला इयॉनसमोर कोलकाताने गमावलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्याचं आव्हान असणार आहे. कोलकाताने गौतम गंभीरच्या नेतृत्वात दोन वेळा विजेतेपद मिळवलं होतं. मात्र त्यानंतर कोलकाताला अंतिम फेरीत पोहचता आलेलं नाही.
आकडेवारी काय सांगते?
आयपीएलच्या इतिहासात दोन्ही संघ एकूण 29 वेळा आमनेसामने भिडले आहेत. यामध्ये कोलकाता काही अंशी वरचढ आहे. कोलकाताने यापैकी 16 सामने जिंकले आहेत. तर बंगळुरुने कोलकातावर 13 मॅचमध्ये मात केली आहे.
आरसीबीने साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात दिल्ली विरुद्ध शेवटच्या चेंडूवर सिक्स ठोकत सनसनाटी विजय मिळवला. त्यामुळे बंगळुरुचा विश्वास दुणावलेला आहे. बंगळुरु पॉइंट्सटेबलमध्ये 18 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
कोलकाताची निराशाजनक कामगिरी
कोलकाताची यो 14 व्या मोसमात निराशाजनक कामगिरी राहिली. मात्र त्यानंतरही नेट रन रेट्सच्या जोरावर 14 गुणांसह कोलकाता प्लेऑफमध्ये पोहचणारा चौथा संघ ठरला.
कोलकाताने या मोसमातील 14 पैकी 7 सामन्यात विजय मिळवला. तर तितक्याच सामन्यात पराभव स्वीकारावा लागला.
कोलकाताने राजस्थानचा 86 धावांनी विजय मिळवत प्लेऑफमधील स्थान निश्चित केलं. टीम मॅनेजमेंटला कोलकाताकडून या एलिमिनेटर सामन्यातही अशाच प्रकारच्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
आरसीबीची जमेची बाजू
आरसीबीकडे स्वत: विराटसह, एबी डीव्हीलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, आणि देवदत्त पडीक्कलसारखे इनफॉर्म फलंदाज आहेत. तर दुसऱ्या बाजूला
श्रीकर भरतही चांगली कामगिरी करतोय.
विकेटकीपर बॅट्समन भरतने गेल्या सामन्यात 52 चेंडूत नाबाद 78 धावांची खेळी केली होती. विशेष म्हणजे शेवटच्या चेंडूवर कचकचीत सिक्स खेचला होता. तर अष्टपैलू मॅक्सवेलही निर्णायक भूमिका बजावली आहे. मॅक्सवेलने या मोसमात आतापर्यंत 498 धावा केल्या आहेत.
गोलंदाजीबाबत म्हणायचं झालं, तर हर्षल पटेलने प्रतिस्पर्धी संघाचा बाजार उठवलाय. हर्षलने 14 सामन्यात 30 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये मुंबई विरुद्धच्या हॅटट्रिकचाही समावेश आहे.
मोहम्मद सिराज आणि जॉर्ज गार्टनही प्रभावशाली ठरलेत. तर युझवेंद्र चहलनेही फिरकीच्या जोरावर 16 फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवलाय.
त्यामुळे एलिमिनेटर सामन्यात अनुभवी विराटच्या नेतृत्वात बंगळुरु विजयी पताका फडकवणार, की कोलकाताचा 'जितबो रे' होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
दोन्ही टीमचे संभावित प्लेइंग इलेव्हन
आरसीबी - विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडीक्कल, केएस भरत (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, एबी डीव्हीलियर्स, डॅन क्रिश्चियन, जॉर्ज गार्टन, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज आणि हर्षल पटेल.
केकेआर - वेंकटेश अय्यर, शुबमन गिल, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, इयोन मोर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), आंद्रे रसेल, लॉकी फर्ग्यूसन, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरेन.