IPL च्या इतिहासातील सगळ्यात महागडे ओव्हर, ज्याला आजही विसरणं कठीण
काही खेळाडू असा निगेटीव्ह रेकॉर्ड आपल्या नावे करतात, जे रेकॉर्ड ब्रेक करण्याची कोणत्याही खेळाडूची इच्छा नसते.
मुंबई : दरवर्षी आयपीएलमध्ये अनेक रेकॉर्ड बनत असतात. ज्यांना तोडणं फारंच कठीण असतं. परंतु अनेक खेळाडू असे असतात जे त्या रेकॉर्डला तोडण्यासाठी प्रयत्न करतात. आयपीएल असे अष्टपैलू खेळाडू खेळण्यासाठी उतरतात, ज्याच्या खेळाला उत्तर देणं भल्याभल्यांना शक्य होतं नाही. परंतु या सगळ्यात काही खेळाडू असा निगेटीव्ह रेकॉर्ड आपल्या नावे करतात, जे रेकॉर्ड ब्रेक करण्याची कोणत्याही खेळाडूची इच्छा नसते. कारण याचा थेट परिणाम त्यांच्या करिअरवर होतो. असेच काहीसे आयपीएलमधील रेकॉर्डस आहेत. जे त्याच्या इतिहासातील असे रेकॉर्डस मानले जातात, ते कोणीही ब्रेक करण्याचा स्वप्नात सुद्धा विचार करत नाही. हा रेकॉर्ड आहे, सर्वात महागडा ओव्हर.
कोणताही बॉलर त्याच्या बॉलिंगच्या स्टाईलसाठी ओळखला जातो. त्यात जो बॉलर कमीत कमी रन समोरच्या टीमला देईल आणि जास्तीत जास्त विकेट घेईल तो सर्वोत्तम बॉलर मानला जातो आणि यासंबंधीत रेकॉर्ड तोडण्यासाठी अनेक बॉलर रांगेत आहेत.
परंतु जर त्याच बॉलरने जर आपल्या बॉलिंगमध्ये समोरील टीमला जास्तीत जास्त रन्स करण्याची संधी दिली तर? तर मात्र त्यांचं करिअर धोक्यात येणारच. असंच काहीसं आयपीएलच्या इतिहासात 3 खेळाडूंसोबत झालं आहे. ज्यांनी जास्तीत जास्त रन्स समोरील टीमला करण्याची संधी दिली.
आता हे खेळाडू कोणते? आणि हे सगळं कधी आणि कसं घडलं होतं हे जाणून घेऊया
प्रशांत परमेश्वरन (वर्ष-2011)
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं ओव्हर 2011 मध्ये टाकण्यात आलं होतं. 8 मे 2011 रोजी, आयपीएलच्या चौथ्या हंगामात, कोची टस्कर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या संघाशी सामना होता. या सामन्याच्या एका ओव्हरमध्ये म्हणजे फक्त 6 बॉलमध्ये 37 धावा झाल्या आणि हा पराक्रम ख्रिस गेलने केला. डावाच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये ख्रिस गेलने प्रशांत परमेश्वरनविरुद्ध जबरदस्त फलंदाजी केली
या ओव्हरमध्ये 1 नो बॉलही होता. या 6 बॉलमधये, नो बॉल आणि 6, 4, 4, 6, 6, 4 अशा धावा झाल्या. या सामन्यात धावांचा पाठलाग करताना गेलने ही जलद खेळी खेळली.
हर्षल पटेल (वर्ष-2021)
आयपीएल 2021 मध्ये, चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात रवींद्र जडेजाने एका ओव्हरमध्ये 36 धावा केल्या. जडेजाने हा पराक्रम आरसीबीच्या हर्षल पटेलविरुद्ध केला. जडेजाने या ओव्हरमध्ये 5 सिक्स आणि एक फोर लगावला. या सामन्यात रवींद्र जडेजाने 221.43 च्या स्ट्राइक रेटने केवळ 28 चेंडूत 62 धावा केल्या, ज्यात 4 चौकार आणि 5 सिक्सचा समावेश होता.
चेन्नई सुपर किंग्जच्या डावातील शेवटच्या ओव्हरमध्ये रवींद्र जडेजासमोर हर्षल पटेल होता. जडेजाने हर्षलविरुद्ध 5 सिक्स मारून चेन्नई सुपर किंग्जला 191 धावांपर्यंत नेले आणि एका ओव्हरमध्ये 5 सिक्स मारणारा आयपीएल इतिहासातील जडेचा तिसरा खेळाडू ठरला.
परविंदर अवाना (वर्ष-2014)
2014 च्या आयपीएलमध्ये सुरेश रैनाने पंजाबचा गोलंदाज परविंदर अवानाच्या एका ओव्हरमध्ये 33 धावा केल्या. ज्यामुळे हे आयपीएलच्या इतिहासातील तिसरे सर्वात महागडे ओव्हर ठरले आहे.
2014 च्या क्वालिफायर 2 मध्ये चेन्नईचा सामना किंग्स इलेव्हन पंजाबशी झाला होता, या सामन्यात चेन्नईला पराभवाला सामोरे जावे लागले होते, यावेळी रैनाने आपल्या स्फोटक खेळीने सर्वांची मने जिंकली. डावाच्या सहाव्या ओव्हरमध्ये परविंदर अवाना गोलंदाजीला आला, तेव्हा सुरेश रैनाने त्याच्या ओव्हरमध्ये एकूण 33 धावा काढल्या. रैनाने या षटकात 5 चौकार आणि 2 सिक्स मारले. या षटकात 6, 6, 4, 4, नो बॉल + 4, 4, 4 धावा झाल्या.