Mumbai Indians Retention List 2025:  इंडियन प्रिमिअर लिगच्या 2025 च्या पर्वासाठी संघांकडून रिटेन केलेल्या खेळाडूंच्या यादीत एकूण पाच जणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे एकेकाळी संघाचं नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्माला रिटेन करणाऱ्यांच्या यादीत थेट चौथं स्थान मिळालं आहे. यामुळे रोहितच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी रोहितला पहिलं प्राधान्य द्यायला हवं होतं असं म्हटलं आहे. मात्र यावर रोहितने पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.


कोणाला किती रुपयांना केलं रिटेन?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई इंडियन्सने रिटेन केलेल्या खेळाडूंच्या यादीत पहिलं नाव जसप्रीत बुमराहचं आहे. त्याच्यासाठी मुंबईच्या संघाने 18 कोटी रुपये मोजले आहेत. त्या खालोल सर्वाधिक रक्कम टी-20 चा टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला देण्यात आली असून ही रक्कम 16 कोटी 35 लाख देण्यात आले आहेत. तितकेच पैसे हार्दिक पांड्यालाही देत तिसऱ्या क्रमांकावर त्याला रिटेन करण्यात आलं आहे. रिटेन करण्यात आलेल्या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर असून त्याच्यासाठी संघाने 16 कोटी 30 लाख रुपये मोजले आहेत. तर मुंबईचा पाचवा रिटेन खेळाडू आहे तिलक वर्मा. तिलककाठी मुंबईने 8 कोटी मोजले आहेत. मुंबईच्या संघाने इशान किशन आणि टीम डेव्हीडसारख्या खेळाडूंना रिटेन केलेलं नाही. 


रिटेनशनबद्दल रोहित काय म्हणाला?


रिटेनशनच्या यादीत चौथ्या स्थानी असण्यासंदर्भात रोहितकडे विचारणा करण्यात आली असता त्याने आधी मुंबईत रिटेन झाल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. 'मुंबईच्या संघातून परत खेळण्याची संधी मिळाल्याबद्दल रोहितने समाधान व्यक्त केलं आहे. "मी मुंबईत फार क्रिकेट खेळलो आहे. याच ठिकाणी मी माझं क्रिकेट करिअर सुरु केलं. त्यामुळेच माझ्यासाठी हे शहर फार खास आहे. तुम्ही एवढ्या दिर्घ काळ खेता तेव्हा या संघासोबत तुमच्या अनेक आठवणी जोडलेल्या असतात. मागील दोन ते तीन वर्ष आम्हाला संघ म्हणून फारशी चांगली गेली नाहीत. मात्र ते बदलण्यासाठी आम्हा आशादायी आहोत," असं रोहितने मुंबईकडून रिटेन करण्यात आल्यानंतर म्हटलं आहे.


स्वत:ला चौथ्या स्थानी रिटेन करण्यात आल्याबद्दल रोहितची भूमिका काय?


बुमराह, सूर्यकुमार आणि हार्दिकनंतर रोहितला चौथ्या स्थानी प्राधान्य देण्यात आलं आहे. याबद्दल विचारलं असता त्याने, "मी क्रिकेटच्या या प्रकारातून (टी-20) निवृत्त झालो आहे. त्यामुळे माझ्यामते माझ्यासाठी ही (चौथ्या स्थानी रिटेन होणे) अगदी उत्तम जागा आहे. जे खेळाडू देशाचं प्रतिनिधित्व करतात अशा खेळाडूंना आधी प्राधान्य दिलं पाहिजे. माझा यावर फार विश्वास असून जो काही निर्णय घेतला आहे त्याबद्दल मी फार समाधानी आहे," असं रोहितने म्हटल्याचं वृत्त 'ईएसपीएन क्रिकइन्फो'ने दिलं आहे.


रोहितने व्यक्त केलेल्या या मतासाठी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून त्याने घेतलेली भूमिका ही तरुण खेळाडूंना प्रेरणा देणारी आहे, असं चाहत्यांनी म्हटलं आहे.