IPL Points table 2023: वानखेडे स्टेडियमवर मंगळवारी पार पडलेल्या मुंबई विरुद्ध बंगळुरु (MI vs RCB) सामन्यामध्ये मुंबईने सामना 6 गडी आणि 21 चेंडू राखून जिंकला. सूर्यकुमार यादव आणि निहाल वधेराने केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर मुंबईच्या संघाने 200 धावांचं लक्ष्य 16.3 ओव्हरमध्येच गाठलं. या मोठ्या विजयामुळे मुंबईने पॉइण्ट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली असून नेट रन रेटमध्येही चांगलीच सुधारणा झाली आहे. मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी हा सुखद धक्का असला तरी दुसरीकडे बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सच्या चाहत्यांसाठी मात्र चिंतेत टाकणारी घसरण झाली आहे. या सामन्यानंतरची पॉइण्ट्स टेबलची स्थिती काय आहेत हे पाहूयात...


पाच क्रमांकांनी घेतली झेप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईचा संघ आरसीबीवर विजय मिळवण्याआधी पॉइण्ट्स टेबलमध्ये 8 व्या स्थानी होता. मात्र मोठ्या फरकाने सामना जिंकल्याने आणि विजयाचे 2 गुण मिळाल्याने मुंबईने थेट 5 क्रमांकांनी झेप घेतली आहे. 8 व्या क्रमांकावरुन मुंबईने थेट तिसऱ्या क्रमांकापर्यंत मजल मारली आहे. सध्या मुंबई आपल्या 11 सामन्यांपैकी 6 सामने जिंकून 12 गुणांसहीत तिसऱ्या स्थानी आहे. मुंबईचा 5 सामन्यांमध्ये पराभव झाला आहे. मुंबईचा नेट रन रेट उणे 0.255 इतका आहे. मागील 5 सामन्यांपैकी 3 सामने मुंबईने जिंकले आहेत. 


नेट रन रेटमध्ये मुंबईला फायदा तर आरसीबीला फटका


मुंबईने झेप घेतल्याने मुंबईविरुद्धच्या सामन्याआधी सहाव्या स्थानी असलेल्या बंगळुरुचा संघ एका क्रमांकाने खाली घसरला आहे. बंगळुरुचा संघ सध्या 7 व्या स्थानावर आहे. आरसीबीने 11 पैकी 5 सामने जिंकले असून 6 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. खात्यावर 10 गुण असलेल्या आरसीबीला मागील 5 सामन्यांपैकी केवळ 2 सामने जिंकता आले आहेत. मोठ्या फरकाने सामना हरल्याने आरसीबीला नेट रनरेटचाही फटका बसला आहे. मुंबईविरुद्धच्या सामन्याआधीच्या -0.209 या नेट रन रेटमध्ये पडझड होऊन ते -0.345 वर पोहोचलं आहे. तर दुसरीकडे मुंबईच्या नेट रन रेटमध्ये सुधारणा झाली आहे. सामन्यापूर्वी -0.454 असणारं मुंबईचं नेट रन रेट -0.255 वर आलं आहे. लिग स्टेजमधील सर्व सामन्या संपल्यानंतर समान गुण असणारे संघ बाद फेरीत जाणार की नाही हे नेट रन रेटवर निश्चित केलं जातं. त्यामुळेच मुंबईचं नेट रन रेट सुधारल्याने त्यांना स्पर्धेतील पुढील वाटचालीमध्ये मोठा फायदा होणार आहे. 


 



पुढचा सामना टॉपरबरोबर


मुंबईचा पुढील सामना 12 मे रोजी गुजरात जायंट्सविरुद्ध होणार आहे. हा सामना मुंबईचं होम ग्राऊण्ड असलेल्या वानखेडेवर खेळवला जाणार आहे. सध्या गुजरात पॉइण्ट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. गुजरातने आपल्या 11 सामन्यांपैकी 8 सामने जिंकले असून त्यांचे एकूण 16 गुण आहेत.