मोठ्या भावाप्रमाणे Virat कोहलीने राहुल चहरला दिलं प्रोत्साहन तर यशही मिळालं
विराटने दिलेला सल्ला असा कामी आला.
मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्ध आयसीसी टी20 विश्वचषक 2021 च्या सराव सामन्यात, विराट कोहली टीम इंडियाचा कर्णधार नसला तरी, तो टीमसाठी 'बिग ब्रदर' म्हणून दिसला. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या 3 विकेट अवघ्या 11 धावांवर पडल्या. यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला.
ग्लेन मॅक्सवेल खूप आक्रमक खेळत होता. जेव्हा राहुल चहरने 12 व्या ओव्हरमध्ये पहिला बॉल टाकला, तेव्हा मॅक्सवेलने रिव्हर्स स्वीप शॉट खेळला आणि फोर मारला. यानंतर विराट कोहली राहुल चहरकडे आला आणि त्याला काहीतरी समजावून सांगितले. विराटला ग्लेन मॅक्सवेलच्या खेळण्याची पद्धती माहिती होती कारण ते आरसीबी संघात एकत्र खेळतात.
विराटचा सल्ला कामी आला
राहुल चहरने 12 व्या ओव्हरचा 5 वा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला. ग्लेन मॅक्सवेलने लेग साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याची विकेट पडली. चाहरने मॅक्सीला बोल्ड केले आणि त्यामुळे टीम इंडियाला सर्वात मोठा दिलासा मिळाला.
टीम इंडियाने सामना जिंकला
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 5 गडी गमावून 152 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल टीम इंडियाने 17.5 ओव्हरमध्ये फक्त 2 गडी गमावून 153 धावा केल्या आणि सराव सामना 8 गडी राखून जिंकला. कर्णधार रोहित शर्माने 60 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली.