`तू धोनी नाहीस`; LIVE सामन्यात कॉमेंटेटरचा टोला! मैदानातूनच ईशानने दिला रिप्लाय; पाहा Video
Ishan Kishan Aakash Chopra Video: सामन्यादरम्यान ईशान किशनने एक रिव्ह्यू घेतला. हा रिव्ह्यू स्क्रीनवर पाहताना कॉमेंट्री करणाऱ्या आकाश चोप्राने ईशान किशनचा उल्लेख करत एक टीप्पणी केली आणि यावरुन मैदानात असलेल्या ईशानने जशास तसा रिप्लाय दिला.
Ishan Kishan Aakash Chopra Video: वेस्ट इंडीज विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताने 200 धावांनी विजय मिळवत मालिका 2-1 ने खिशात घातली. या मालिकेमध्ये ईशान किशनने दमदार कामगिरी करत 3 अर्थशतकं झळकावली. या कामगिरीसहीत त्याने स्वत:च्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवला. कोणत्याही 2 संघांमधील मालिकेतील तिन्ही सामन्यांत अर्धशतक झळकावणारा ईशान हा सहावा क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी अशी कामगिरी कृष्णमाचारी श्रीकांत, दिलीप वेंगसरकर, अजरुद्दीन, एम. एस. धोनी आणि श्रेयस अय्यरने केली आहे. मात्र तिसऱ्या सामन्यातील एका वेगळ्याच घटनेमुळे ईशान चर्चेत आहे.
आकाश चोप्रा नेमकं काय म्हणाला?
तिसऱ्या वनडेमध्ये भारताच्या फिल्डींगदरम्यानचा एक किस्सा सोशल मीडियावरील व्हिडीओच्या माध्यमातून व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा हिंदीमध्ये कॉमेंट्री करताना दिसत आहे. ईशानने एका स्टम्पिंगसंदर्भात रिव्ह्यू घेतल्यानंतर आकाश चोप्रा समोर स्क्रीनवर पाहून बोलत होता. यावेळेस अॅक्शन रिप्ले पाहून बोलताना आकाश चोप्राने ईशानची तुलना महेंद्र सिंह धोनीशी केली. धोनी हा त्याच्या अचूक डीआरएस रिव्ह्यूसाठी ओळखला जातो. त्यामुळेच आकाश चोप्राने ईशान आणि धोनीची तुलना केली. "असं फार क्विचित होतं की जेव्हा तुम्ही स्टम्पिंग किंवा रन आऊटसंदर्भात डीआरएसचा वापर करतात. मला आता तरी फलंदाजाचा पाय जमीनीवर दिसत आहे. ईशान तू रांचीचा आहेस मात्र तुझं नाव महेंद्र सिंह धोनी नाही," असं आकाश चोप्राम कॉमेन्ट्रीदरम्यान म्हणाला.
ईशानने मैदानावरुनच दिला रिप्लाय
विशेष म्हणजे कॉमेन्ट्री बॉक्समध्ये बसून आकाश चोप्राने ही प्रतिक्रिया नोंदवल्यानंतर मैदानात असलेल्या ईशानने पुढल्या क्षणीच त्याला रिप्लाय दिला. हा रिप्लाय स्टम्प माईकमध्ये रेकॉर्ड झाला. "हा मग ठीक आहे..." असं ईशान म्हणतो. हे ऐकून आकाश चोप्रा हसू लागतो. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आकाश चोप्रानेच हा व्हिडीओ ट्वीटरवरुन शेअर केला आहे. लव्ह यू ईशान अशा कॅप्शनसहीत आकाश चोप्राने हा व्हिडीओ शेअर केलाय.
एकदिवसीय क्रिकेट मालिकेमध्ये दमदार कामगिरी केल्याबद्दल ईशान किशनला 'प्लेअर ऑफ द सीरीज' पुस्काराने गौरवण्यात आलं. मात्र सामन्यानंतर बोलताना ईशानने मला मोठी धावसंख्या उभारायची होती. मात्र ते मला जमलं नाही, असं म्हणत खंत व्यक्त केली.