`हातावर टॅटू असूनही मी साईबाबांना दोष द्यायचो की तुमच्यामुळेच...`; इशानचा पहिल्यांदाच खुलासा
Ishan Kishan Sai Baba Tattoo: टॅटू गोंदवणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये इशान किशनचं आवर्जून नाव घ्यावं लागेल. इशानच्या हातावर तसेच छातीवरही टॅटू आहे. इशानने या टॅटूसंदर्भात मोठा खुलासा कौन बनेगा करोडपतीमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासमोरच केला आहे.
Ishan Kishan Sai Baba Tattoo: भारतीय क्रिकेट संघामधील सर्वात स्टायलिस्ट क्रिकेटपटूंमध्ये सध्या शुभमन गीलबरोबरच मुंबई इंडियन्सच्या माध्यमातून समोर आलेल्या इशान किशनचाही समावेश होतो. इशान किशन हा त्याच्या फलंदाजीबरोबरच मैदानाबाहेरील फॅशन, टॅटू आणि कपड्यांसाठीही ओळखला जातो. तशी इशान आणि शुभमनची यारी दोस्ती कायमच चर्चेत असते. कधी प्रॅक्टीस सेशनमधील फोटो तर कधी किस्स्यांमधून या दोघांची चर्चा असते. मात्र सध्या सोशल मीडियावर इशानची चर्चा ही तो अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या कौन बनेगा करोडपतीच्या 15 व्या पर्वामुळे आहे. नाताळ स्पेशल कार्यक्रमामध्ये इशान आणि भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना सहभागी झाले होते. या दोघांबरोबर अनेक विषयांवर अमिताभ यांनी गप्पा मारल्या. दरम्यान एका चाहतीने इशानला त्याच्या शरीरावरील टॅटूंबद्दल विचारलं असता इशानने उजव्या हातावर असलेल्या साईबाबांच्या टॅटूबद्दल मोठा खुलासा केला.
...म्हणून काढला साईबाबांचा टॅटू
कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका चाहतीने, 'आम्हाला जसं ठाऊक आहे की तुझ्या शरीरावर अनेक टॅटू आहेत. तर या टॅटूंचं महत्त्व तू आम्हाला सांगू शकतोस का?' असा प्रश्न विचारला. त्यानंतर समोरच्या स्क्रीनवर इशानच्या उजव्या हातीवरील साईबाबांचा टॅटू दाखवण्यात आला. तो पाहून इशान हसू लागला. इशानने या टॅटूबद्दल बोलण्यास सुरुवात केली असताना अमिताभही अगदी लक्ष देऊन त्याचं म्हणणं ऐकू लागले. इशानने उजव्या हातावरील साईबाबांच्या टॅटूबद्दल बोलताना, "पहिला टॅटू मी साईबाबांचा काढला होता. माझा त्यांच्यावर फार विश्वास आहे," असं म्हटलं.
साईबाबांना द्यायचो दोष
मात्र पुढे बोलताना इशानने आपण वाईट कामगिरीसाठी साईबाबांना दोष द्यायचो असंही म्हटलं. साईबाबांवर आपला इतका विश्वास आहे की त्यांचा टॅटू हातावर असला तरी मी त्यांना अनेकदा दोष द्यायचो, असं इशानने सांगितलं.
नक्की वाचा >> Video: जया बच्चन 'डॉन', 'सरकार' की...; इशानच्या 'त्या' प्रश्नावर अमिताभ काय म्हणाले पाहा
"मी विश्वास असल्याने साईबाबांचा टॅटू हातावर काढला असला तरी त्याचवेळी असंही व्हायचं की कधी धावा झाल्या नाहीत तर मी त्यांनाच दोष द्यायचो आणि म्हणायचो की तुमच्यामुळेच धावा नाही झाल्या," असं इशान साईबाबांवरील श्रद्धेबद्दल बोलताना म्हणाला.
छातीवरही खास टॅटू
पुढे बोलताना इशानने, "मी दुसरा टॅटू ढोपराजवळ बनवला होता. तो 'बिलीव्ह' असा होता. म्हणजे आयुष्यात अनेक गोष्टी घडतात पण आपण विश्वास ठेवायला हवा असं यामधून सांगायचं आहे," आपल्या टॅटूबद्दल म्हटलं. त्याचप्रमाणे इशानने छातीवर ट्रस्ट युआर स्ट्रगल असा टॅटू काढल्याचंही सांगितलं. त्याच्या या टॅटूचा फोटो मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात आला. तो फोटो पाहून इशानने, "खेळात आहोत आणि त्यात स्ट्रगल नसेल तर त्यात मजाच नाही," म्हणून हा टॅटू छातीवर काढून घेतल्याची माहिती दिली.
टीव्हीवर चांगला दिसेल असा टॅटू
आपल्या शरीरावरील चौथ्या टॅटूबद्दल बोलताना इशानने, "मी चौथा टॅटू हातावर काढला आहे. मात्र तो काढताना मी टॅटू आर्टीस्टला टीव्हीवर चांगलं वाटेल असं काहीतरी काढ असं सांगितलं होतं," असं इशानने सांगताच अमिताभही हसू लागले. पुन्हा इशानच्या या चौथ्या टॅटूचा फोटो दाखवण्यात आला तेव्हा त्यानेच, "पाहा ना छान दिसतोय ना टॅटू?" असं म्हटलं असता सर्वांनी हसत टाळ्या वाजवल्या.