T20 World Cup: या 4 संघाना सेमीफायनलमध्ये स्थान पक्क करणं होतंय कठीण
जर येणारा रविवारचा सामना जिंकला नाही तर भारतासाठीही सेमीफायनचा रस्ता खडतर होऊ शकतो.
मुंबई : ICC T-20 वर्ल्डकप 2021 मध्ये, मोठ्या टीम्स बाजी मारताना दिसतायत. ज्यामध्ये UAEच्या खेळपट्टीला देखील काही प्रमाणात जबाबदार धरलं जातंय. आयपीएल 2021 स्पर्धाही टी-20 वर्ल्डकपपूर्वी UAE च्या खेळपट्ट्यांवर खेळली गेली. सुपर 12 टप्प्यात 6-6 टीम्सचे 2 गट तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक गटातून दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.
दरम्यान भारतही यंदा अडखळताना दिसतोय. जर येणारा रविवारचा सामना जिंकला नाही तर भारतासाठीही सेमीफायनचा रस्ता खडतर होऊ शकतो. तर असे 4 संघ आहेत ज्यांचं T20 वर्ल्डकप 2021च्या उपांत्य फेरीत पोहोचण्याचं स्वप्न पूर्ण होणं कठीण दिसतंय. अशा 4 संघांवर एक नजर टाकूया-
ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया भक्कम क्रिकेटपटू असूनही ऑस्ट्रेलियन संघ टी-20 फॉरमॅटमध्ये स्वत:ला सिद्ध करण्यात अपयशी ठरला आहे. टी-20 फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियाची कामगिरी बऱ्याच दिवसांपासून घसरत आहे. 2010 साली ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्यांदा आणि शेवटच्यांदा T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. त्यावेळी इंग्लंडकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता.
ऑस्ट्रेलिया संघात मोठे दिग्गज आहेत, परंतु तरीही ते या फॉर्मेटवर वर्चस्व राखण्यात अपयशी ठरलेत. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा अलीकडचा फॉर्म फारसा प्रभावशाली नाही. कांगारू संघाची कामगिरी पाहता 2021 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याची शक्यता कमी आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.
बांग्लादेश
T-20 वर्ल्डकप 2021 मधील सुपर 12 ची सुरुवात बांग्लादेशसाठी खूपच खराब झाली आहे. बांग्लादेशला श्रीलंका आणि इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्यांची उपांत्य फेरीत जाण्याची शक्यता खूपच कमी आहे. T-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत बांग्लादेश पहिल्या 8 मध्येही नाही. बांग्लादेश टीमने अलिकडच्या काळात टी-20 फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. ICC T20 विश्वचषक 2021साठी त्याने एक चांगला संघ देखील निवडला आहे, ज्यात मुस्तफिझूर रहमान, महमुदुल्लाह, शाकिब अल हसन, मुशफिकुर रहीम, सौम्या सरकार सारखे महान क्रिकेटपटू आहेत, परंतु T20 विश्वचषक स्पर्धेत अशा मजबूत संघांच्या उपस्थितीमुळे, त्यांच्यासाठी उपांत्य फेरी गाठणं कठीण होतंय.
न्यूझीलंड
ICC T20 विश्वचषक 2021मध्ये न्यूझीलंडला गट 2 मध्ये स्थान देण्यात आलंय. न्यूझीलंड गट 2 मध्ये भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या टीम्ससह आहे. आयसीसी स्पर्धांमध्ये न्यूझीलंड नेहमीच चांगली कामगिरी करत असला, तरी विजेतेपद मिळवण्यात मिळणं त्यांच्यासाठी कठीण होतं. गेल्या वर्षी न्यूझीलंड दौऱ्यावर टीम इंडियाने 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत न्यूझीलंडचा 5-0 असा पराभव केला होता. यानंतर न्यूझीलंडने या फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली असली तरी नुकत्याच झालेल्या बांगलादेश दौऱ्यात न्यूझीलंडच्या संघाचा 3-2 असा पराभव झाला.
किवी संघाचा कर्णधार केन विलिम्सनची बॅट सध्या चालत नाहीये. याशिवाय न्यूझीलंडने अनुभवी फलंदाज रॉस टेलरचाही संघात समावेश केलेला नाही. त्यामुळे किवीजसाठी उपांत्य फेरीत प्रवेश करणं कठीण असल्याचं दिसतंय.
श्रीलंका
2021च्या आयसीसी टी-20 वर्ल्डकप सर्वात कमकुवत संघ म्हणून श्रीलंका समजली जातेय. नुकत्याच झालेल्या भारताच्या श्रीलंका दौऱ्यात युवा खेळाडूंच्या श्रीलंकेच्या टीमने अप्रतिम कामगिरी केली. अनुभवी संघ नसतानाही श्रीलंकेने भारताविरुद्धची टी-२० मालिका 2-1 अशी जिंकली. पण टी-20 वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेसमोर बलाढ्य टीम्स आहेत. त्यांच्यासमोर टिकून राहणे फार कठीण आहे. अशा स्थितीत श्रीलंकेला टी-20 विश्वचषक 2021 ची उपांत्य फेरी गाठणं कठीण आहे.