लंडन : भारत आणि इंग्लंडमधल्या ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला अजून सुरुवात झालेली नाही. १ ऑगस्टला या सीरिजमधली पहिली टेस्ट खेळवण्यात येणार आहे. पण त्याआधीच इंग्लंडच्या टीमकडून भारतीय खेळाडूंवर निशाणा साधायला सुरुवात झाली आहे. जोपर्यंत भारत जिंकतोय तोपर्यंत मी रन केले नाही तरी काहीही फरक पडत नाही. जोपर्यंत टीम चांगली कामगिरी करत आहे तोपर्यंत मला वैयक्तिक फॉर्मची चिंता नाही, असं वक्तव्य विराट कोहलीनं केलं होतं. इंग्लंडचा फास्ट बॉलर जेम्स अंडरसननं विराटच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये वैयक्तिक फॉर्म महत्त्वाचा वाटत नसेल तर विराट खोटं बोलतं आहे, असं अंडरसन म्हणाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१४ सालच्या इंग्लंड दौऱ्यामध्ये विराट कोहलीला संघर्ष करावा लागला होता. ५ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये विराटला १३४ रनच बनवता आल्या होत्या. टेस्ट क्रिकेटमधली विराटची ही सगळ्यात खराब कामगिरी होती. त्यावेळी अंडरसननं ६ इनिंगपैकी ४ वेळा विराटची विकेट घेतली होती. अंडरसननं टेस्ट क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत ५ वेळा विराटची विकेट घेतली आहे. पण २०१६-१७ साली जेव्हा इंग्लंडची टीम भारताच्या दौऱ्यावर होती तेव्हा विराटनं ५ टेस्ट मॅचमध्ये ६५५ रन केल्या होत्या.


विराट शिकला असेल


मॅचचं फुटेज बघून नाही तर अनुभवामुळे तुम्ही शिकता. त्यामुळे कोहली मागच्या दौऱ्यामधून शिकला असेल, असं अंडरसन म्हणाला. भारत आणि इंग्लंडमधला संघर्ष रोमांचक होईल, अशी प्रतिक्रिया अंडरसननं दिली.