सेंच्युरियन : इंग्लंडचा फास्ट बॉलर जेम्स एँडरसन विक्रमाच्या जवळ जाऊन पोहोचला आहे. गुरुवारपासून इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पहिल्या टेस्ट मॅचला सुरुवात होत आहे. ही टेस्ट मॅच जेम्स एँडरसनची १५०वी टेस्ट मॅच असणार आहे. अंडरसन १५० टेस्ट मॅच खेळणारा ९वा खेळाडू ठरणार आहे. अंडरसनआधी सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग, स्टीव्ह वॉ, जॅक कॅलिस, शिवनारायण चंद्रपॉल, राहुल द्रविड, एलिस्टर कूक, एलन बॉर्डर यांनी १५० टेस्ट खेळण्याचा पराक्रम केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेम्स एँडरसन हा या दशकातला सर्वाधिक विकेट घेणारा फास्ट बॉलर आहे. तर दशकात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत एँडरसन दुसऱ्या क्रमांकावर आहे. एँडरसनने २०१० ते २०१९ या दशकात ५३५ विकेट घेतल्या, तर अश्विनने ५६४ विकेट घेतल्या आहेत.


एँडरसनने त्याची शेवटची टेस्ट ऍशेसमध्ये खेळली होती, पण यानंतर त्याला दुखापत झाली होती. बऱ्याच कालावधीनंतर एँडरसन टेस्ट क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. चार-पाच महिन्यानंतर परतल्यामुळे थोडी अडचण होईल, अशी प्रतिक्रिया एँडरसनने दिली आहे.


अंडरसनने वयाच्या २०व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. २०२१ ऍशेसपर्यंत क्रिकेट खेळण्याची अंडरसनची इच्छा आहे. २००३ साली क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या अंडरसनने १४९ टेस्ट मॅचमध्ये ५७५ विकेट घेतल्या आहेत. सर्वाधिक टेस्ट विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अंडरसन चौथ्या क्रमांकावर आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या फास्ट बॉलरच्या यादीत अंडरसन पहिल्या क्रमांकावर आहे.