दुसऱ्या टेस्टसाठीही बुमराह फिट नाही
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा ३१ रननी पराभव झाला.
लंडन : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा ३१ रननी पराभव झाला. यानंतर आता ९ ऑगस्टपासून लॉर्ड्सवर दुसरी टेस्ट सुरु होणार आहे. पण या टेस्ट मॅचमध्येही भारताचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह खेळणार नाही. बुमराह अजूनही फिट झालेला नसल्यामुळे त्याला या टेस्टला मुकावं लागणार आहे. अंगठा फ्रॅक्चर झाल्यानंतरही बुमराहची इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या तीन टेस्टसाठी निवड करण्यात आली होती. दुसऱ्या टेस्टसाठी बुमराह फिट होईल अशी बीसीसीआयला अपेक्षा होती पण बीसीसीआयची ही अपेक्षा फोल ठरली.
बुमराह फिट नसला तरी नेटमध्ये मात्र तो सराव करतो आहे. बुमराहला पूर्णपणे फिट व्हायला आणखी काही दिवस लागतील असा अंदाज आहे. दुसऱ्या टेस्टपासून बुमराह फिट होईल आणि त्यानंतर शेवटच्या दोन टेस्टच्या निवडीसाठी त्याचा फिटनेस बघू अशी प्रतिक्रिया बीसीसीआयनं दिली होती. भारत आणि इंग्लंडमध्ये ५ टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे.
आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० मॅचदरम्यान बुमराहच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. इंग्लंडमध्ये शस्त्रक्रिया झाल्यानंतर वनडे सीरिजदरम्यान बुमराह भारतात परत आला होता. टेस्ट सीरिजमध्ये निवड झाल्यानंतर बुमराह पुन्हा इंग्लंडला रवाना झाला.