टीम इंडियाला मोठा धक्का! संघाला वाऱ्यावर सोडून बुमराह मायदेशी; वाचा नेमकं कारण काय?
Jasprit Bumrah, Asia Cup 2023 : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह वैयक्तिक कारणांमुळे भारतात परतला आहे. मात्र, चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे तो कदाचित आशिया कप सुपर-4 टप्प्यासाठी संघात सामील होऊ शकतो.
Jasprit Bumrah Returned to India : सध्या श्रीलंकेमध्ये सुरू असलेल्या आशिया कप स्पर्धेत (Asia Cup) टीम इंडियाच्या कामगिरीवर जगाचं लक्ष आहे. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाला नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही. तर गोलंदाजांची परीक्षा देखील झाली नाही. पावसाने सामना धुवून निघाला. त्यामुळे आता टीम इंडियाला 1 गुण मिळाला आहे. तर पाकिस्तानने सुपर 4 मध्ये क्वालियाफ केलंय. अशातच आता टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानच्या स्टार गोलंदाजांना आस्मान दाखवणारा आणि टीम इंडियाच्या गोलंदाजीचा बॅकबोन जसप्रीत बुमराह आता मायदेशी परतला आहे.
मीडिया रिपोर्ट्समधून आलेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह वैयक्तिक कारणांमुळे भारतात परतला आहे. मात्र, चाहत्यांना काळजी करण्याची गरज नाही. जसप्रीत बुमराह कदाचित आशिया कप सुपर-4 टप्प्यासाठी संघात सामील होऊ शकतो. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत मोहम्मद शमी संघात सामील होणार आहे. उद्या भारत आणि नेपाळ यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे या सामन्यात शमी मैदानात उतरलेला दिसू शकतो.
मागील महिन्यात बुमराहने कमबॅक केलं होतं. आयर्लंड दौऱ्यात जसप्रीत बुमराह भारतीय संघात कर्णधार म्हणून परतला होता. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत बुमराहला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर तो जवळपास 11 महिने क्रिकेटपासून दूर होता. आयर्लंड मालिकेत तो खूप चांगल्या फॉर्ममध्ये दिसला होता. या मालिकेतील मॅन ऑफ सिरीजचा किताब देखील बुमराहने पटकावला होता. त्यानंतर आता त्याला आशिया कपमध्ये संधी देण्यात आली आहे.
दरम्यान, आशिया कपमधील पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानविरुद्ध कडवी झुंज दिली. भारताने प्रथम फलंदाजी करताना 266 धावा केल्या होत्या. या सामन्यात अखेरच्या काही षटकात बुमराहने आक्रमक फलंदाजीचा नजारा दाखवला होता. बुमराहने हॅरीस रौफ, शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह यांना चौकार खेचत टीम इंडियाला 250 पार केलं होतं. त्यानंतर त्याच्या गोलंदाजी परीक्षा होती. मात्र, बुमराहला गोलंदाजीची संधी मिळाली नाही.