बुमराहने उलगडलं त्याच्या भेदक यॉर्करचं रहस्य
भारताचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह गेल्या २ वर्षांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत आहे.
मुंबई : भारताचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह गेल्या २ वर्षांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत आहे. बुमराह हा त्याच्या भेदक यॉर्करसाठी ओळखला जातो. एवढे अचूक यॉर्कर टाकणं आपण कसे शिकलो, याबद्दलच्या रहस्याचा उलगडा जसप्रीत बुमराहनं केला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला जसप्रीत बुमराहनं मुलाखत दिली आहे.
'लहानपणी मी सर्वाधिक काळ टेनिस बॉलनं क्रिकेट खेळलो. टेनिस बॉलनं क्रिकेट खेळत असताना तुम्हाला एकाच प्रकारची बॉलिंग करावी लागते. या प्रकारच्या क्रिकेटमध्ये तुम्ही बाऊन्सर टाकू शकत नाही. मग तुम्हाला यॉर्करचाच पर्याय उरतो. तुम्हाला एकाच बॉलचा सराव करावा लागतो. त्यावेळी मी फक्त मजा म्हणून खेळायचो. पण जेव्हा मी क्रिकेटला गंभीरपणे घ्यायला लागलो, तेव्हा मला यॉर्करचं महत्त्व कळालं', अशी प्रतिक्रिया बुमराहनं दिली.
यापुढे बुमराह म्हणाला 'यॉर्कर बॉल मला नैसर्गिकरित्या टाकता येतो. यासाठी मला सराव करण्याची गरज पडत नाही. मॅचमध्ये यॉर्कर टाकण्यासाठी तेवढीच मेहनत घ्यावी लागते. मी आताही छोट्या छोट्या गोष्टी योग्य करण्यासाठी मी आजही तेवढाच वेळ घालवतो. क्रिकेटचे तिन्ही फॉरमॅट हे वेगवेगळे आहेत. त्यामुळे प्रत्येकासाठी वेगळी तयारी करावी लागते.'
जसप्रीत बुमराहला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे आणि न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे आणि टी-२० सीरिजसाठी आराम देण्यात आला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध २४ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-२० आणि वनडे सीरिजसाठी बुमराहचं पुनरागमन होण्याची शक्यता आहे.