न्यूझीलंविरोधात घरच्या मैदानावर 0-3 ने पराभव झाल्यानंतर आम्ही खांद्यावर कोणतंही ओझं न ठेवता ऑस्ट्रेलियाविरोधातील आव्हानात्मक कसोटी मालिकेचा सामना करणार आहोत असं भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराहने म्हटलं आहे. रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिली कसोटी खेळणार नाही. रोहित शर्माच्या पत्नीने मुलाला जन्म दिला असून, यानिमित्ताने तो भारतातच थांबला आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत पहिल्या सामन्यासाठी जसप्रीत बुमराहकडे नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. गोलंदाजांना कर्णधारपद देणं ही तशी दुर्मिळच बाब आहे. मात्र जसप्रीत बुमराहच्या मते फलंदाजांच्या तुलनेत त्यांची आकडेवारी चांगली आहे. यामुळे त्यांना जास्तीत जास्त नेतृत्वाची संधी दिली जावी. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"ही सन्मानजनक बाब आहे. माझी स्वत:ची एक स्टाईल आहे. रोहित वेगळा होता आणि माझी एक स्वत:ची पद्धत आहे. हा सन्मान आहे. मी हे पद म्हणून पाहत नाही. मला जबाबदारी घेण्यास आवडतं. मी रोहितशी याआधी बोललो होतो. पण येथे आल्यानंतर मला नेतृत्वाबद्दल थोडी स्पष्टता मिळाली," असं जसप्रीत बुमराह म्हणाला आहे. पर्थमधील पहिल्या कसोटी सामन्याआधी जसप्रीत बुमराहने पत्रकार परिषद घेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 


"मी नेहमीच गोलंदाजांना कर्णधार करावं या बाजूने मत मांडलं आहे. त्यांची आकडेवारी उत्तम आहे. पॅट कमिन्सने जबरदस्त कामगिरी केली आहे. भूतकाळात अशी अनेक उदाहरणं आहेत. कपिल देव यांच्यासह अनेक असे कर्णधार होते. ही नव्या परंपरेची सुरुवात असेल अशी आशा आहे," असं जसप्रीत बुमराह म्हटला आहे. शुक्रवारपासून भारत-ऑस्ट्रेलियामधील पाच कसोटींची मालिका सुरु होणार आहे. 


"जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा शून्यापासून सुरुवात करता आणि हारता तेव्हाही शून्यापासून सुरुवात होते. आम्ही भारतातून कोणतंही ओझं घेऊन आलेलो नाही. न्यूझीलंड मालिकेतून आम्ही काही गोष्टी शिकलो आहोत हे नक्की आहे. पण त्यावेळी स्थिती वेगळी होती आणि येथील आमचे निकाल वेगळे आहेत," असं जसप्रीत बुमराहने सांगितलं.


जसप्रीत बुमराहने यावेळी पहिली कसोटी खेळणारा संघ निवडण्यात आला असून, टॉसच्या वेळीच त्याबद्दल खुलासा करु असं सांगितलं. "आम्ही प्लेईंग 11 अंतिम संघ निवडला आहे. तुम्हाला उद्या सामना सुरु होण्याआधी याबद्दल समजेल," असं बुमराह म्हणाला.