बुमराह मुंबईत परतला अन् दुसऱ्याच दिवशी पत्नीने दिला मुलाला जन्म! मुलाचं नाव...
Jasprit Bumrah Wife Sanjana Ganesan: आशिया चषक मालिका अर्ध्यात सोडून बुमराह अचानक का परतला असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. बीसीसीआयकडूनही `खासगी कारणासाठी` बुमराह परतला आहे, एवढीच माहिती देण्यात आली.
Jasprit Bumrah Wife Sanjana Ganesan: भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसाठी यंदाचं वर्ष फारच स्पेशल आहे. क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केल्यानंतर आता जसप्रीतच्या खासगी आयुष्यातही एक गोड गोष्ट घडली आहे. जसप्रीत बुमराह आणि त्याची पत्नी संजना गणेशनला पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे. आशिया चषक स्पर्धेमधून बुमराह तडकाफडकी रविवारी भारतात परला. यामागील कारणांबद्दल चर्चा सुरु असतानाच बुमराहने आपल्याला मुलगा झाल्याची घोषणा इन्स्टाग्रामवरुन केली आहे.
अचानक परतला
मागील अनेक महिन्यांपासून पाठीच्या दुखण्यामुळे मैदानापासून दूर असलेल्या बुमराहने आयर्लंड दौऱ्यामधून पुनरागमन केलं. विशेष म्हणजे थेट कर्णधार म्हणून संघाची जबाबदारी खांद्यावर घेत बुमराहने भारताला मालिका जिंकवून दिली. आता आशिया चषक स्पर्धेमधील बुमराहच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच अचानक बुमराह दौरा अर्ध्यात सोडून मायदेशी परतला आणि चर्चांना उधाण आलं. बुमराह अचानक मायदेशी परतण्यामागे कारण सांगण्यात आलं नव्हतं. मात्र आज सकाळी बुमराहने इन्स्टाग्रामवरुन पोस्ट करत मुलगा झाल्याची माहिती चाहत्यांना दिली.
काय म्हणाले दोघे?
"आमचं छोटसं कुटुंब आज विस्तारलं आहे. आम्हाला यापूर्वीह कधीही झाला नव्हता एवढा आनंद होत आहे. आज सकाळी आम्हाला मुलगा झाला. आम्ही अंगद जसप्रीत बुमराहचं जगात स्वागत करतो. आम्हाला फारच आनंद झाला आहे. आयुष्यातील या नव्या अध्यायाबरोबर येणाऱ्या अनेक गोष्टींसाठी आम्ही फारच उत्साही आहोत," असं जसप्रीत आणि संजनाने मुलाच्या जन्माची माहिती देताना म्हटलं आहे.
अनेकांनी केलं अभिनंदन
जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन 15 मार्च 2021 रोजी विवाहबंधनात अडकले. संजना ही स्पोर्ट्स अँकर आहे. रोहित शर्माची पत्नी ऋतिका, युवराजची पत्नी हेजलबरोबरच बुमराहचा सहकारी सुर्यकुमार यादवनेही या दोघांना बाळाच्या जन्मानंतर शुभेच्छा दिल्या आहेत.
पुन्हा परतणार आशिया चषकासाठी
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात बुमराहला गोलंदाजीची संधी मिळाली नाही. मात्र त्याने फलंदाजीमध्ये आपलं योगदान दिलं. शाहीन शाह आफ्रिदीबरोबरच हारिस रौफ आणि नदीमलाही बुमराहने चौकार लगावल्याने भारताचा स्कोअर 266 पर्यंत पोहोचला. भारताचा दुसरा सामना आज श्रीलंकेतील कॅण्डीच्या मैदानात नेपाळविरुद्ध होणार आहे. या सामन्यापूर्वीच बुमराह आपल्या मुंबईतील घरी परतला आहे. मालिका अर्ध्यात सोडून बुमराह अचानक का परतला असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. बीसीसीआयकडूनही 'खासगी कारणासाठी' बुमराह परतला आहे, एवढीच माहिती देण्यात आली होती. मात्र आज सकाळी यामागील गोड कारण समोर आलं आहे. बुमराह पाकिस्तानविरुद्ध सुपर-4 मध्ये 10 सप्टेंबरमध्ये होणाऱ्या सामन्याआधी पुन्हा श्रीलंकेत परतणार आहे.