मुंबई : २०१९ सालचा वर्ल्ड कप आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. ३० मेपासून या वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये जसप्रीत बुमराह भारताचा हुकमी एक्का असेल, असं वक्तव्य सचिन तेंडुलकरनं केलं आहे. आयपीएलमधून उदयाला आलेला जसप्रीत बुमराह आता भारतीय टीमच्या प्रत्येक फॉरमॅटमधला प्रमुख बॉलर बनला आहे. टेस्ट क्रिकेटमध्येही त्यानं वेगळा ठसा उमटवला आहे. तर आयसीसीच्या वनडे क्रमवारीमध्ये बुमराह सध्या बॉलरच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. या कामगिरीमुळे सचिननंही बुमराहचं कौतुक केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'बुमराहच्या यशामुळे मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही. त्याच्याबरोबर मी वेळ घालवला आहे. सुधारणा करण्यासाठी आणि शिकण्यासाठी बुमराह प्रामाणिक प्रयत्न करतो. योग्य वेळी तो जगातल्या दिग्गज बॅट्समनना त्रास देईल, हे मला माहिती होतं', असं वक्तव्य सचिननं केलं.


'सुधारणा करण्यासाठी बुमराह कसे प्रयत्न करतो, हे मी जवळून बघितलं आहे. २०१५ साली केन विलियमसन आणि त्याच्यामधला संघर्ष मी पाहिला. त्यावेळीच बुमराह स्वत:चा ठसा उमटवेल, असं मला वाटलं होतं', अशी प्रतिक्रिया सचिननं दिली. अचूकपणा आणि सातत्य या गोष्टी बुमराहला खास बनवतात, असं सचिनला वाटतं.


'बुमराहची बॉलिंग ऍक्शन, फसवी बॉलिंग आणि सातत्यानं विकेट घेण्याची त्याची क्षमता यामुळे तो अधिक धोकादायक बनतो. ठरवलेली योजना कशी अमलात आणावी हे त्याला कळतं. बुमराह हा वर्ल्ड कपमध्ये प्रतिस्पर्धी टीमला सर्वाधिक धोका देईल', असं विधान सचिननं केलं.


बुमराहबरोबरच सचिन तेंडुलकरनं ऋषभ पंत आणि त्याच्या निडरपणाचंही कौतुक केलं आहे. ऋषभ पंतचं भविष्य चांगलं असल्याचंही सचिननं सांगितलं. पंतनं त्याचं लक्ष केंद्रीत केलं आणि खेळाचा आनंद लुटला तर त्याच्यासाठी योग्य गोष्टी होतील, असं मत सचिननं व्यक्त केलं.