भारतीय निवड समितीमध्ये आणखी दोघांचा समावेश
भारतीय क्रिकेट टीमच्या निवड समितीमध्ये आणखी दोघांचा समावेश करण्यात आला आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेट टीमच्या निवड समितीमध्ये आणखी दोघांचा समावेश करण्यात आला आहे. जतिन परांजपे आणि गगन खोडा यांनी निवड समितीमध्ये पुनरागमन केलं आहे. एमएसके प्रसाद (अध्यक्ष), देवांग गांधी आणि सरदीप सिंग यांच्याबरोबरच आता जतिन परांजपे आणि गगन खोडा असे मिळून ५ जण निवड समितीचे सदस्य झाले आहेत. हे पाच जणं इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या आणि पाचव्या टेस्ट मॅचच्या टीमची निवड करतील.
परांजपे आणि खोडा हे टेस्ट क्रिकेट खेळले नसल्यामुळे जानेवारी २०१७ मध्ये त्यांना निवड समितीवरून हटवण्यात आलं होतं. लोढा समितीच्या शिफारसीनुसार निवड समिती तीन सदस्यांची करण्यात आली. पण बीसीसीआयनं ५ सदस्यांची गरज असल्याचं पटवून दिल्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं याला परवानगी दिली. आणि आता पुन्हा एकदा परांजपे आणि खोडा निवड समितीमध्ये आले आहेत.
याचबरोबर अंजली पेंढारकर आणि सुधा शाह यांचंही महिलांच्या निवड समितीमध्ये पुनरागमन झालं आहे. त्यामुळे महिला टीमच्या निवड समितीमध्ये हेमलता काला (अध्यक्ष), शशी गुप्ता, अंजली पेंढारकर, लोपामुद्रा बॅनर्जी आणि सुधा शाह यांचा समावेश आहे. महिलांची निवड समिती श्रीलंका आणि वेस्ट इंग्लंडविरुद्धच्या आयसीसी वूमन्स चॅम्पियनशीपसाठीच्या टीमची आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टी-२०साठीच्या टीमची घोषणा करेल.
तसंच बीसीसीआयनं सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस लक्ष्मण यांच्या क्रिकेट सल्लागार समितीला ज्युनिअर टीमच्या निवड समिती अध्यक्षाची घोषणा करायला सांगितलं आहे. याआधी व्यंकटेश प्रसाद ज्युनिअर टीमच्या निवड समितीचा अध्यक्ष होता. पण आयपीएलमध्ये पंजाबच्या टीमचा बॉलिंग प्रशिक्षक झाल्यामुळे प्रसादनं निवड समिती अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. जानेवारी २०१७ मध्ये आशिष कपूर यांना काढल्यानंतर त्याजागी व्यंकटेश प्रसादची निवड झाली होती.
बीसीसीआयच्या पुढच्या सर्वसाधारण सभेमध्ये या तिन्ही निवड समितीचे सदस्य बदलले जाऊ शकतात.