मुंबई : आयपीएल सुरु होण्याआधी मुंबईच्या टीमसाठी चांगली बातमी आहे. सय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीमध्ये विकेट कीपर आणि बॅट्समन ईशान किशननं लागोपाठ दुसरं शतक ठोकलं आहे. ईशान किशन हा आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळतो. उन्मुक्त चंद याच्यानंतर टी-२० क्रिकेटमध्ये लागोपाठ २ शतकं करणारा ईशान किशन हा दुसरा भारतीय खेळाडू आहे. ईशान किशनचा हा फॉर्म बघता आयपीएलमध्ये मुंबईच्या टीमच्या अपेक्षा नक्कीच वाढल्या असतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२० वर्षांच्या ईशान किशननं सय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीमध्ये झारखंडकडून खेळताना मणीपूरविरुद्ध ६२ बॉलमध्ये ११३ रनची खेळी केली. यामध्ये १२ फोर आणि ५ सिक्सचा समावेश होता. ईशान किशनच्या या खेळीमुळे झारखंडनं २० ओव्हरमध्ये २१९/१ एवढ्या स्कोअरचा पल्ला गाठला. यानंतर झारखंडच्या बॉलरनी मणीपूरला २० ओव्हरमध्ये ९८/९ एवढाच स्कोअर करुन दिला. यामुळे झारखंडचा या मॅचमध्ये १२२ रननी विजय झाला.


याआधीच्या मॅचमध्ये ईशान किशननं जम्मू काश्मीरविरुद्ध ५५ बॉलमध्ये १०० रनची खेळी केली होती. यामध्ये ईशान किशननं ८ फोर आणि ७ सिक्स मारले. टी-२० क्रिकेटमध्ये शतक करणारा ईशान किशन हा पहिला भारतीय विकेट कीपर ठरला होता. जम्मू काश्मीरविरुद्धच्या या मॅचमध्ये झारखंडचा ९ विकेटनी विजय झाला होता.


लागोपाठ २ टी-२० मॅचमध्ये शतक करून ईशान किशन ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर, इंग्लंडचा केव्हिन पीटरसन, लुक राईट, दक्षिण आफ्रिकेचा रीझा हेन्ड्रीक्स या खेळाडूंच्या यादीत पोहोचला आहे.


सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेच्या पॉईंट टेबलमध्ये झारखंड सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. पहिल्या तिन्ही मॅचमध्ये झारखंडचा पराभव झालेला नाही. यानंतर आता २७ फेब्रुवारीला विजयवाडा इथे झारखंडचा मुकाबला नागालँडशी होईल.


सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धा संपल्यानंतर ईशान किशन आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळताना दिसेल.