IND VS SA: `Lord Shardul`च्या कामगिरीने अश्विन थक्क, भर मैदानात विचारला `हा` प्रश्न
अश्विनने विचारलेला प्रश्न स्टम्पवर लावलेल्या मायक्रोफोनमुळे सर्वांनाच ऐकू गेला
Johannesburg Test : भारत आणि दक्षिण आफ्रिका (Ind Vs SA 2nd Test) यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना जोहान्सबर्ग (Johannesburg) इथं खेळवला जात आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. पण आजचा दिवस गाजवला तो भारताचा स्टार गोलंदाज शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur).
आपल्या भेदक गोलंदाजीने शार्दुलने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना त्यांच्याच भूमीत सळो की पळो करुन सोडलं. दक्षिण आफ्रिकेची पहिली इनिंग २२९ धावांवर आटोपली. यात शार्दुल ठाकूरची कामगिरी होती ६१ धावांवर ७ विकेट. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वात कमी धावा देऊन ७ विकेट घेणारा शार्दुल ठाकूर भारताचा पहिला गोलंदाज ठरला आहे.
शार्दुलच्या गोलंदाजीने अश्विन भारावला
शार्दुल ठाकूरच्या या कामगिरीने भारताचा स्पीन गोलंदाज आर अश्विनही (R Ashwin) भारावला. भर मैदानातच अश्विनने शार्दुला एक प्रश्न विचारला. स्टम्पवर लागलेल्या मायक्रोफोनमुळे हा प्रश्न सर्वांनाच ऐकू गेला.
अश्विनने शार्दुल ठाकूरला विचारलं, तू कोण आहेस? तू गोलंदाजी करतोस आणि विकेट पडतात. अश्विनचा हा प्रश्न योग्य देखील आहे कारण टीम इंडियाला जेव्हा जेव्हा विकेटची गरज भासली तेव्हा शार्दुलने ही कामगिरी चोख बजावली.
पाच विकेट घेणारा सहावा गोलंदाज
जोहान्सबर्गमध्ये पाच विकेट घेणारा शार्दुल हा भारताचा सहावा गोलंदाज ठरला आहे. याआधी अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ, एस श्रीसंत, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीने ही कामगिरी केली आहे.
भारताकडे ५८ धावांची आघाडी
दुसऱ्या डावात भारताने दिवसअखेर ८५ धावा केल्या असून २ विकेट गमावल्या आहेत. सलामीला आलेला कर्धणार केएल राहुल अवघ्या ८ धावा करुन पॅव्हेलिअनमध्ये परतला. तर मयंक अग्रवालही २३ धावा करुन बाद झाला. यानंतर मैदानात आलेल्या चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य राहणे या जोडीने सावध फलंदाजी करत आणखी पडझड होऊ दिली नाही. दिवसखेर पुजारा ३५ तर रहाणे ११ धावांवर खेळत आहेत. भारताकडे आता ५८ धावांची आघाडी आहे.