दुबई : शनिवारी जाहीर करण्यात आलेल्या ICC टी-20 रँकिंगमध्ये भारताचा ओपनर लोकेश राहुल सहाव्या स्थानावर कायम आहे. तर कर्णधार विराट कोहली एक स्थान वर आला आहे. तो आता नवव्या स्थानावर पोहोचला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या टी20 सिरीजनंतर आयसीसीने टी 20 रँकिंगची घोषणा केली आहे. भारताने 3 सामन्यांची ही सीरीज 2-0 ने जिंकली होती. तर एक सामना हा पावसामुळे रद्द झाला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रँकिंगमध्ये सहाव्या स्थानी असलेल्य़ा राहुलने श्रीलंकेच्या विरुद्ध झालेल्या सीरीजमध्ये 45 आणि 54 रनची खेळी केली होती. ज्यामुळे त्याला 26 अंकांचा फायदा झाला. तो आता ऑस्ट्रेलियाच्या मॅक्सवेलपासून फक्त 6 अंक मागे आहे. टेस्ट आणि वनडे क्रिकेटमध्ये पहिल्या स्थानी असलेला कोहली टी20 मध्ये नवव्या आणि तर शिखर धवन 15व्या स्थानी पोहोचला आहे. 


मनीष पांडे देखील 4 पाऊल पुढे सरकला आहे. तो 70व्या स्थानी आहे. टी-20 रँकिंगमध्ये भारतीय गोलंदाजांना देखील फायदा झाला आहे. यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपमध्ये यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.


सीरीजमध्ये नवदीप सैनी 146 वरुन ९८ व्या स्थानी पोहोचला आहे. तर शार्दुल ठाकुर देखील 92व्या स्थानावर आला आहे. या दोन्ही गोलंदाजांनी या सीरीजमध्ये ५-५ विकेट घेतले होते. बुमराह 39 व्या स्थानी आहे.  


ICC टीम रँकिंगमध्ये भारताला 2 अंकांचा फायदा झाला आहे. 260 अंकांसह भारत पाचव्या स्थानी आहे. श्रीलंकेचा पराभव झाल्यामुळे त्यांना 2 अंकाचं नुकसान झालं आहे. श्रीलंका आणि अफगाणिस्तान 236 अंकांसह बरोबरीवर आहेत.