अंपायरच्या चुकीच्या निर्णयावर अखेर Kane Williamson ने सोडलं मौन, म्हणाला...
गेल्या दोन सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सनच्या विकेटवरून वाद निर्माण झाला होता.
मुंबई : केन विलियम्सनच्या विकेटवरून आयपीएलमध्ये वाद झालेला पहायला मिळाला. मुख्य म्हणजे गेल्या दोन सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सनच्या विकेटवरून वाद निर्माण झाला होता. केनच्या चाहत्यांनी यावरून सोशल मीडियावरही टीका केली होती. तर याबाबत आता खुद्द केनने त्याचं मत व्यक्त केलं आहे.
चेन्नई सुपर किंग्ज टीमला नमवून केन विलियम्सन यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावेळी केन विलियम्सन म्हणाला, गेल्या दोन सामन्यांमध्ये ज्या पद्धतीने मी आऊट होतो त्याने मला वाईट वाटलं आहे. कारण मला मोठी खेळी खेळायची होती. मात्र टीमसाठी योगदान देणं हे माझ्यासाठी मोठं आहे.
नेमकं प्रकरण काय?
लखनऊ सुपर जाएंट्स विरूद्ध झालेल्या सामन्यात हैदराबाद फलंदाजी करत असताना चौथ्या ओव्हरमध्ये आवेश खानने केन विलियम्सनची विकेट काढली. दरम्यान केन आऊट झाल्यानंतर एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये हे स्पष्टपणे दिसून येतंय की, ज्यावेळी केन आऊट झाला तेव्हा 30 यार्डांच्या बाहेर फक्त तीन फिल्डर हजर होते, म्हणजेच संपूर्ण वर्तुळात 6 फिल्डर उपस्थित होते.
तर पहिल्या सामन्यात देखील केन विलियम्सनला चुकीच्या निर्णयाचा फटका बसला होता. हैदराबाद फलंदाजी करत असताना राजस्थानकडून प्रसिद्ध कृष्णा दुसरी ओव्हर टाकत होता. या ओव्हरमधील चौथा बॉल विलियम्सनच्या बॅटला कट लागून विकेटकीपर संजू सॅमसनच्या हातात गेला. मात्र चेंडू संजूच्या हाती लागला, पण तो पकडू शकला नाही. यावेळी बॉल हवेत उडाला आणि स्लिपला उभ्या असलेल्या देवदत्त पडिकलकडे गेला. संजूकडून चुकलेल्या चेंडू देवदत्तने पकडला.
मात्र यावेळी तो मैदानावर उपस्थित असलेल्या अंपायरला कॅच पकडला गेला की बॉल जमिनीला लागला हे समजलं नाही. अंपायरने विलियम्सन आऊट असल्याचा सॉफ्ट सिग्नल दिला. आणि हे तपासण्यासाठी थर्ड अंपायरला विनंती केली. यावेळी थर्ड अंपायरने प्रत्येक अँगलमधून रिप्ले पाहिला आणि विलियम्सनला आऊट दिला. याच मुद्द्यावरून वाद निर्माण झाला.