भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी बीसीसीआयला (BCCI) माजी क्रिकेटर अंशुमन गायकवाड (Anshuman Gaekwad) यांना आर्थिक मदत करण्यासाठी आवाहन केलं आहे. अंशुमन गायकवाड सध्या कर्करोगाशी झुंज देत आहेत. त्यांना रक्ताचा कॅन्सर झाला आहे. 71 वर्षीय अंशुमन गायकवाड यांच्यावर गेल्या एका वर्षापासून लंडनच्या किंग कॉलेज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कपिल देव यांनी माजी सहकारी मोहिंदर अमरनाथ, सुनील गावसकर, संदीप पाटील, दिलीप वेंगसरकर, मदनलाल, रवी शास्त्री आणि कीर्ती आझाद हे अंशुमन गायकवाड यांच्या उपचारासाठी निधी मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआय या प्रकरणी लक्ष घालेल आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू, मुख्य प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांना आर्थिक मदत करेल असा विश्वास कपिल देव यांनी व्यक्त केला आहे. "हे दुःखद आणि अत्यंत निराशाजनक आहे. मला वेदना होत आहेत कारण मी अंशूसोबत खेळलो आहे आणि त्याला या अवस्थेत पाहणे मला सहन होत नाही. कोणालाही असा त्रास होऊ नये. मला माहित आहे की बोर्ड त्याची काळजी घेईल. आम्ही कोणावरीह सक्ती करत नाही. त्यांच्यासाठी येणारी कोणतीही मदत मनापासून आली पाहिजे. अनेक जलदगती गोलंदाजांचा सामना करताना त्यांनी चेहरा आणि छातीवर चेंडू झेलले आहेत. आता आपली त्यांच्यासाठी उभं राहण्याची वेळ आहे. क्रिकेट चाहते त्यांना नाराज करणार नाही याची मला खात्री आहे. ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करावी,” असं कपिल देव यांनी स्पोर्ट्सस्टारला सांगितले.


दिग्गज अष्टपैलू खेळाडूने यावेळी अंशुमन यांच्यासारख्या प्रकरणांमध्ये माजी खेळाडूंना मदत करणारी यंत्रणा नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. परिस्थिती सुधारली नाही तर आपण पेन्शन सोडण्यास तयार असल्याचंही कपिल देव यांनी ठणकावून सांगितलं.


"दुर्दैवाने, आपल्याकडे कोणतीही यंत्रणा नाही. या पिढीचे खेळाडू चांगले पैसे कमावतात हे पाहून खूप आनंद झाला. सपोर्ट स्टाफ सदस्यांनाही चांगला पगार मिळतो ही चांगली बाब आहेय आमच्या काळात बोर्डाकडे पैसे नव्हते. पण आता त्यांनी भूतकाळातील वरिष्ठ खेळाडूंची काळजी घ्यायला हवी. पण ते त्यांचं योगदान कुठे पाठवतात? जर एखादी ट्रस्ट उभारली तर तिथे ते पैसे ठेवू शकतात. परंतु आमच्याकडे अशी व्यवस्था नाही. एक ट्रस्ट असावी आणि बीसीसीआय ते करु शकतं. ते नक्कीच माजी आणि सध्याच्या खेळाडूंची काळजी घेतात. जर कुटुंब आम्हाला परवानगी देईल तर आम्ही आमच्या पेन्शनची रक्कम दान करण्यास तयार आहोत," असं कपिल देव म्हणाले आहेत. 


अंशुमन गायकवाड यांचा क्रिकेटचा वारसा उल्लेखनीय आहे. त्यांनी 1975 ते 1987 दरम्यान भारतासाठी 40 कसोटी आणि 15 एकदिवसीय सामने खेळले होते. नंतर दोन वेगवेगळ्या कार्यकाळात भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले.