नवी दिल्ली : जगविख्यात धावपटू उसेन बोल्टला मागे टाकणरा भारतातला धावपटू सापडलाय. आता त्याला ऑलिम्पिकला धावण्याची तयारीही सुरू झाली आहे. कर्नाटकातल्या मंगळुरुमध्ये श्रीनिवास गौडा या तरुणाने उसेन बोल्टचा विक्रम मोडला. म्हशींबरोबर चिखलात धावतानाचा श्रीनिवास गौडाचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवरही चांगलाच व्हायरल झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीनिवासने  १०० मीटरचं अंतर ९.५५ सेकंदात पूर्ण केलं, तर १४२.५० मीटर त्याने १३ सेकंदांत गाठलं. जगविख्यात धावपटू उसेन बोल्टनं २००९ मध्ये १०० मीटरचं अंतर ९.५८ सेकंदांत पूर्ण केलं होतं. लोक माझी तुलना उसेन बोल्टसोबत करतात, पण तो वर्ल्ड चॅम्पियन आहे. मी फक्त दलदल असलेल्या जमिनीवर धावतो, असं श्रीनिवास म्हणाला आहे.


श्रीनिवास गौडाचा व्हिडीओ व्हायरल होताच क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी त्याची दखल घेतली आहे. श्रीनिवास गौडाला साई अर्थात स्पोर्टस अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये बोलावलं जाईल आणि त्याच्या प्रतिभेला साजेसं प्रशिक्षण दिलं जाईल, असं ट्विट क्रीडा मंत्री किरण रिजीजूंनी केलंय.



गौडाच्या या धावण्याबद्दल दोन थिअरी आहेत. काही लोकांच्या म्हणण्यानुसार म्हशी जोरात धावल्या म्हणून गौडा जोरात धावला. तर काहींच्या मते गौडा चिखलात एवढा जोरात धावतो तर तो रेसिंग ट्रॅकवर किती जोरात धावेल? आता श्रीनिवास गौडा उसेन बोल्टला मागे टाकतो का, ते कळेलच.