भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला केरळ हायकोर्टाची नोटीस
विराटला केरळच्या उच्च न्यायालयाने नोटीस पाठवली आहे.
मुंबई : विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे, परंतु त्याआधी त्याला केरळच्या उच्च न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. रम्मीची ऑनलाईन जाहिरात केल्यामुळे त्याला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. विराट कोहली हा सध्याचा जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू मानला जातो आणि जगभरात त्याचे लाखो चाहते आहेत. गेल्या वर्षी त्याने सेलिब्रिटी ब्रँड अॅन्डोर्समेंटच्या यादीत अव्वल स्थान मिळविले होते.
बुधवारी केरळ उच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला ऑनलाईन रम्मीवर बंदी घालण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर नोटीस बजावली. कर्णधार विराट कोहली व्यतिरिक्त उच्च न्यायालयाने अभिनेत्री तमन्नाह भाटिया आणि अभिनेता अजू वर्गीस यांनाही नोटीस पाठविली आहे. हे सर्व तारे ऑनलाईन रमी गेम्सचे ब्रँड अँबेसेडर आहेत. या सर्वांव्यतिरिक्त केरळ राज्य सरकारकडूनही यासंबंधी प्रतिसाद मागविण्यात आला आहे. हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश एस मणिकुमार यांच्या अध्यक्षतेखालील डिव्हिजन खंडपीठाने पाठवलेल्या नोटीसमध्ये हे सर्व मागविण्यात आले आहेत.
याचिकेत म्हटले आहे की विराट कोहली, तमन्ना भाटिया आणि अजू वर्गीस या व्यासपीठावर लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी खोट्या आश्वासनांद्वारे लोकांना आकर्षित करतात आणि प्रत्यक्षात त्यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात पैसे जिंकण्याची शक्यता कमी आहे. अशा प्रकारे ते लोकांना मूर्ख बनवतात. याचिकेत केरळ गेमिंग अॅक्ट 1960 चा उल्लेखही आहे. ऑनलाइन जुगार, सट्टेबाजी यासारख्या क्रिया या त्या कायद्यात समाविष्ट नाहीत. यामुळे त्यांच्यावर लगाम लावणं शक्य होत नाहीये. याचिकाकर्त्याने मात्र अनेक उच्च न्यायालयांच्या आदेशाचा संदर्भही दिला.
विराट कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर भारतात परतला होता. आता भारत इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर भारताला टी -२० सामने आणि त्यानंतर तीन एकदिवसीय सामने खेळायचे आहेत.