मुंबई : २०१९ वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय टीमची घोषणा सोमवारी करण्यात आली. वर्ल्ड कपसाठीच्या या भारतीय टीममध्ये जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी हे तीन फास्ट बॉलर आहेत. पण खलील अहमद, नवदीप सैनी, दीपक चहर आणि आवेश खान यांची निवड झालेली नसली तरी ते भारतीय टीमसोबत वर्ल्ड कपसाठी इंग्लंडला जाणार आहेत. भारतीय बॅट्समनना नेटमध्ये सराव देण्यासाठी हे चौघं टीमसोबत इंग्लंडमध्ये असतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय खेळाडूंना सराव देणारे हे चौघे फास्ट बॉलर सध्या आयपीएलमध्ये वेगवेगळ्या टीमकडून खेळत आहेत. खलील अहमद हैदराबादकडून, दीपक चहर चेन्नईकडून आणि नवदीप सैनी बंगळुरूकडून खेळत आहे. तर आवेश खान दिल्लीच्या टीमचा हिस्सा आहे.


वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय टीमची निवड करताना खलील अहमद आणि नवदीप सैनी यांच्या नावाचा विचार करण्यात आल्याचं एमएसके प्रसाद यांनी सांगितलं. पण त्यांना टीममध्ये संधी मिळाली नाही. वर्ल्ड कपदरम्यान हे दोघं भारतीय टीमसोबतच असतील. एखाद्या फास्ट बॉलरला दुखापत झाली तर यांच्यापैकी एकाची निवड बदली खेळाडू म्हणून होऊ शकते.


भारतीय टीमच्या सरावासाठी फास्ट बॉलरना पाठवण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी युएईमध्ये झालेल्या आशिया कपदरम्यान आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, सिद्धार्थ कौल, शाहबाज नदीम आणि मयंक मार्कंडे भारतीय टीमच्या मदतीसाठी गेले होते. तर दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये आवेश खान, मोहम्मद सिराज, बसील थंपी आणि अंकित राजपूत भारतीय टीमसोबत होते.


३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. या वर्ल्ड कपमध्ये भारताची पहिली मॅच ५ जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये १० टीम सहभागी झाल्या आहेत. यातल्या प्रत्येक टीम एकमेकांविरुद्ध एक मॅच खेळतील. यानंतर टॉप-४ टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील. पहिली सेमी फायनल ९ जुलैला, दुसरी सेमीफायनल ११ जुलैला आणि वर्ल्ड कपची फायनल १४ जुलैला होईल.


अशी असणार भारतीय टीम


विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, केएल राहुल, विजय शंकर


वर्ल्ड कपमधल्या भारताच्या मॅच


५ जून- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका


९ जून- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया


१३ जून- भारत विरुद्ध न्यूझीलंड


१६ जून- भारत विरुद्ध पाकिस्तान


२२ जून- भारत विरुद्ध अफगाणिस्तान


२७ जून- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज


३० जून- भारत विरुद्ध इंग्लंड


२ जुलै- भारत विरुद्ध बांगलादेश


६ जुलै- भारत विरुद्ध श्रीलंका