मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये भारताचा २२४ रननं शानदार विजय झाला. रोहित शर्मा, अंबाती रायुडूचं शतक आणि खलील अहमदच्या बॉलिंगमुळे या मॅचमधला भारताचा विजय सोपा झाला. पण मैदानातल्या गैरवर्तनाबद्दल खलीलला आयसीसीनं फटकारलं आहे. वेस्ट इंडिजचा बॅट्समन मार्लोन सॅम्युअल्ससोबत गैरव्यवहार केल्यामुळे आयसीसीनं खलीलला अधिकृत इशारा दिला आहे. तसंच खलीलला आयसीसीनं एक डिमेरिट पॉइंटही दिलाय, असं वृत्त इएसपीएननं दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खलीलनं १४व्या ओव्हरमध्ये मार्लोन सॅम्युअल्सची विकेट घेतली. यानंतर खलीलनं सॅम्युअल्सकडे बघून अपशब्द वापरले. या मॅचदरम्यान खलीलला अनेकवेळा मोठ्या आवाजात काहीतरी बोलतानाही पाहण्यात आलं.


खलीलनं प्रतिस्पर्धी खेळाडूबद्दल अपशब्द वापरून आचार संहितेचं उल्लंघन केलं आहे, असं आयसीसीनं म्हणलं आहे. खलीलनंही आपण आचार संहितेचं उल्लंघन केल्याचं कबूल केलं आहे. तसंच आयसीसीनं केलेली कारवाईही खलीलनं मान्य केली आहे.


चौथ्या वनडेमध्ये खलील अहमदनं ५ ओव्हरमध्ये १३ रन देऊन ३ विकेट घेतल्या. खलीलनं शिमरोन हेटमायर(१३), रोवमॅन पॉवेल(१) आणि मार्लोन सॅम्युअल्स (१८) या तीन विकेट घेतल्या. खलीलच्या भेदक माऱ्यामुळे विंडीजचा स्कोअर ५६/६ असा झाला होता.