मैदानात वैरी पण बाहेर एकी; ट्रोलिंगनंतर RCBच्या खेळाडूंच्या समर्थनासाठी KKRचा पुढाकार
आरसीबीच्या खेळाडूंच्या समर्थनार्थ कोलकाता नाईट रायडर्सचे खेळाडू उतरलेत.
दुबई : यंदाच्या वर्षीही रॉयल चॅलेंजर बंगळूरूचं आयपीएल जिंकण्याचं स्वप्न हे स्वप्नचं राहिलं आहे. केकेआरने बंगळूरूचा पराभव केला. यानंतर आरसीबी, विराट कोहली तसंच टीममधील खेळाडूंना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातंय. ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि डॅनियल क्रिस्टियन या दोघांनाही ट्रोल्सचा सामना करावा लागला आहे. असं असताना आरसीबीच्या खेळाडूंच्या समर्थनार्थ कोलकाता नाईट रायडर्सचे खेळाडू उतरलेत.
केकेआरने या खेळाडूंच्या समर्थनार्थ आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये टीमचा विकेटकीपर आणि फलंदाज दिनेश कार्तिकने ट्रोलर्सवर टीका केली आहे. त्याने सोशल मीडिया युजर्सना फक्त एका सामन्यातील खराब कामगिरीनंतर खेळाडू आणि त्यांच्या जवळच्या लोकांना वाईट बोलण्याचं टाळा असं आवाहन केलं आहे.
या व्हिडीओमध्ये कार्तिक म्हणाला, “कधीकधी मला वाटतं की, सोशल मीडियाचा योग्य जागा म्हणून वापर आवश्यक आहे. लोकांना जे बोलतात, त्याचं गांभीर्य कळत नाही, मग ते मीम्स, व्हिडिओ असो किंवा फक्त शब्दांचा वापर असो... त्यांच्यासाठी ही क्षणिक बाब आहे. त्यांना तिथे काय वाटतं ते सहजपणे सांगतात. पण ते विचार करत नाहीत की ते कोणासाठी असं बोलत आहेत, त्याचे काय परिणाम होतील."
आरसीबी खेळाडूंच्या समर्थनार्थ KKR
केकेआरने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये असंही म्हटले आहे की, "क्रिकेटपटू अनेकदा ऑनलाईन ट्रोल्सना बळी पडतात. आता त्याविरुद्ध कठोर भूमिका घेण्याची वेळ आली आहे. विजय आणि पराभव हा कोणत्याही खेळाचा भाग असतो. आम्ही RCB आणि त्यांच्या खेळाडूंसोबत उभे आहोत."
किस्टियन आणि प्रेग्नेंट गर्लफ्रेंड झाले ट्रोल
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूचा खेळाडू डॅनियल क्रिश्चियन आणि त्याची गर्भवती गर्लफ्रेंड जॉर्जिया डन यांच्यावर आयपीएल 2021 च्या एलिमिनेटरमध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून झालेल्या पराभवानंतर सोशल मीडियावर बरीच टीका झाली. या सामन्यात डॅनियलने 8 चेंडूत केवळ 9 धावा केल्या. सुनील नरेनने त्याला तीन सिक्सही लगावले. त्याचप्रमाणे ख्रिश्चनने पहिल्या ओव्हरमध्ये 22 धावाही दिल्या. त्यानंतर सामन्याचं चित्र पालटलं. आरसीबीच्या पराभवानंतर चाहत्यांनी डॅनियल ख्रिश्चनलाच नव्हे तर त्याच्या गर्भवती गर्लफ्रेंडवरही निशाणा साधला.