७१ दिवसात एकही अर्धशतक नाही, राहुलवर टीकेची झोड
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचच्या पहिल्या दिवसाच्या शेवटची भारताची अवस्था २५०/९ अशी झाली आहे.
ऍडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचच्या पहिल्या दिवसाच्या शेवटची भारताची अवस्था २५०/९ अशी झाली आहे. पहिल्या इनिंगमध्ये भारताचा ओपनर केएल राहुल पुन्हा एकदा अपयशी ठरला. या मॅचमध्ये राहुल ८ बॉलमध्ये २ रन करून आऊट झाला. यावेळी भारताचा स्कोअर ३ रनवर १ विकेट असा होता. जॉश हेजलवूडच्या बॉलिंगवर एरॉन फिंचनं स्लिपमध्ये राहुलचा कॅच घेतला. २६ वर्षांच्या केएल राहुलनं शेवटचं अर्धशतक यावर्षी आशिया कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध लगावलं होतं. २५ डिसेंबरला राहुलनं ६० रनची खेळी केली होती.
ओपनर केएल राहुलचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये संघर्ष सुरुच आहे. या दौऱ्यातली राहुलची ही चौथी मॅच आहे. याआधी झालेल्या टी-२० सीरिजमध्ये राहुलला एकूण २७ रनच करता आल्या होत्या. टी-२० सीरिजमध्ये राहुलला २ मॅचमध्येच खेळायची संधी मिळाली होती. सीरिजची दुसरी मॅच पावसामुळे रद्द झाली होती.
वेस्ट इंडिजविरुद्धही राहुल फेल
ऑस्ट्रेलियाच नाही तर वेस्ट इंडिजविरुद्धही राहुलला अपयश आलं होतं. वेस्ट इंडिजविरुद्धच्या ३ टी-२० मॅच आणि २ टी-२० मॅचच्या सीरिजमध्ये राहुल भारतीय टीमचा हिस्सा होता. ३ टी-२० मॅचमध्ये राहुलनं ५९ रन केले होते. राहुलनं पहिल्या मॅचमध्ये १६, दुसऱ्या मॅचमध्ये नाबाद २६ आणि तिसऱ्या टी-२०मध्ये १७ रन केले होते. २ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये राहुलला ३ वेळा बॅटिंगची संधी मिळाली. यातल्या एकवेळा राहुल शून्यवर आऊट झाला, तर त्यानं एकदा ४ रन आणि एकदा ३३ रन केले.
१४ टेस्ट इनिंगमध्ये फक्त १ शतक
मागच्या १४ टेस्ट इनिंगमध्ये राहुलला फक्त एकदाच अर्धशतकापेक्षा मोठा स्कोअर करता आला. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये राहुलनं १४९ रनची खेळी केली होती. या खेळीमुळेच राहुलचं भारतीय टीममधलं स्थान पक्कं झालं. पण या मॅचनंतर राहुलनं ४ टेस्ट इनिंग खेळल्या. यामध्ये त्याचा स्कोअर ०, ४, ३३ नाबाद आणि २ रन असा आहे.
१८ वर्षातला ३२ टेस्ट खेळणारा पाचवा ओपनर
केएल राहुलला प्रतिभावान खेळाडू समजलं जातं. राहुल मागच्या १८ वर्षातला ५वा ओपनर आहे ज्यानं ३२ पेक्षा जास्त मॅच खेळल्या आहेत. त्याच्याशिवाय सेहवाग (१०३), मुरली विजय(६०), गौतम गंभीर (५८) आणि शिखर धवन(३४) या खेळाडूंनी एवढ्या मॅच खेळल्या आहेत.
२०१८ मध्ये राहुलच्या ४२२ रन
२०१८ या वर्षात केएल राहुलनं ११ टेस्ट मॅच खेळल्या. या मॅचच्या १९ इनिंगमध्ये राहुलनं २३.४४ च्या सरासरीनं ४२२ रन केले आहेत. यावर्षात राहुलला फक्त १ शतक आणि १ अर्धशतक बनवता आलं. राहुलचा हा खराब फॉर्म भारतासाठी चिंतेचा विषय आहे. कारण ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडण्यात आलेला भारताचा तिसरा ओपनर पृथ्वी शॉ दुखापतग्रस्त आहे. दुसऱ्या टेस्टमध्ये शॉचं खेळणं मुश्कील आहे.