...तर RCB IPL ट्रॉफी जिंकली असती; केएल राहुलने विराटचं नाव घेत व्यक्त केली खंत
KL Rahul Recalls Final Of IPL: के. एल. राहुलच्या या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये भारताचा हा सलामीवीर विराट कोहलीचा उल्लेख करताना दिसत आहे. तो नेमकं काय म्हणालाय पाहूयात...
KL Rahul Recalls Final Of IPL: इंडियन प्रिमिअर लीग 2025 साठी काही दिवसांमध्ये मेगा ऑक्शन म्हणजेच महालिलाव होणार आहे. यापूर्वीच अनेक संघांनी आपल्याकडील काही प्रमुख खेळाडूंना रिटेन करत इतरांना कररामुक्त केलं आहे. विशेष म्हणजे करारमुक्त करण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये अनेक बड्या नावांचा समावेश असून पहिल्यांदाच हे खेळाडू लिलावामध्ये सहभागी होणार आहेत. करारमुक्त करण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत, लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार के. एल. राहुल यासारख्या बड्या खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंनी आता 2 कोटींच्या बेस प्राइजला स्वत: ला लिलावामध्ये लिस्ट केलं आहे. असं असतानाच आता के. एल. राहुलने आयपीएलमधील आपल्या जुन्या आठवणींना एका खास मुलाखतीत उजाळा दिला आहे. यावेळेस बोलताना त्याने 2016 च्या आयपीएलची एक विशेष आठवण सांगितली आहे. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा तत्कालीन कर्णधार विराट कोहलीचा उल्लेख करत ही आठवण सांगताना आजही आम्ही या बद्दल बोलत असतो असं के. एल. राहुल म्हणाला आहे.
अनेकदा विराटबरोबर यासंदर्भात बोललोय
के. एल. राहुलने 'स्टारस्पोर्ट्स इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये 2016 साली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ आयपीएल जिंकण्याच्या फार जवळ आला होता असं म्हटलं आहे. या पर्वातील शेवटच्या सामन्याबद्दल के. एल. राहुलने एक खंत व्यक्त केली आहे. या सामन्यात आपण आणि विराट कोहली उत्तम पार्टनरशीप केली होती. मात्र दोघांपैकी एकजण थोडा अधिक काळ खेळला असता तर सामन्याचा निकाल आमच्या बाजूने लागून आम्ही सामना आणि आयपीएल दोन्ही जिंकलो असतो असं सूचक विधान भारतीय संघातील या सलामीवीराने केलं आहे. आपण याबद्दल विराटबरोबर मागील पाच ते सहा वर्षात अनेकदा बोललो असल्याचंही के. एल. राहुल म्हणाला.
...तर जिंकलो असतो
"मागील पाच ते सहा वर्षात मी आणि विराट याबद्दल अनेकदा बोललो आहोत. आमच्यापैकी एखादा जरी जास्त वेळ मैदानात टिकून असता आणि खेळला असता तर आम्ही जिंकलो असतो. तसं झालं असतं तर परिस्थिती फार वेगळी असते. त्या वर्षीचा आरसबीचा संघ खरोखरच फार खास होता. खरोखरच तो सामना आम्ही जिंकलो असतो तर ते एखाद्या परीकथेप्रमाणे झालं असतं. एका पर्वात पॉइण्ट्स टेबलच्या तळाशी आणि त्यानंतर सलग सात सामने जिंकून पात्रता फेरीसाठी पात्र ठरलो. त्यानंतर अंतिम सामन्यात पोहचून चेन्नास्वीमीच्या घरच्या मैदानावर खेळताना अंतिम सामना जिंकलो असतो तर त्याहून छान काही घडू शकलं नसतं. मात्र दुर्देवाने ते घडलं नाही," असं के. एल. राहुल म्हणाला.
सामन्यात काय घडलेलं?
2016 च्या आयपीएलचा अंतिम सामना आरसीबीचा संघ अवघ्या 8 धावांनी पराभूत झाला होता. सनरायझर्स हैदराबादच्या संघाने दिलेलं 208 धावांचं आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीला 200 धावांपर्यंत मजल मारता आली होती. त्यामुळे या 8 धावा संघाला सहज करता आल्या असत्या जर मी किंवा विराट थोडावेळ अधिक खेळलो असतो अशी खदखद आता के. एल. राहुलने व्यक्त केली आहे.