मुंबई : नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यामध्ये के एल राहुलला संघर्ष करावा लागला. २ टेस्टच्या ४ इनिंगमध्ये राहुलने फक्त १०१ रन केले. राहुलच्या या कामगिरीवर टीम इंडियाची निवड समिती चिंतित आहे. डोपिंग प्रकरणी पृथ्वी शॉचं निलंबन झालं आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी ओपनिंगला बॅटिंग केली. या चारही इनिंगमध्ये दोन्ही ओपनरना चांगली सुरुवात करुन देता आली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केएल राहुलने पहिल्या टेस्टमध्ये ४४ आणि ३८ रन केले, तर दुसऱ्या टेस्टमध्ये फक्त १३ आणि ६ रन करून राहुल आऊट झाला. या कामगिरीमुळे राहुलवर टांगती तलवार आहे. निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी राहुलच्या खराब कामगिरीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसंच टेस्ट क्रिकेटमध्येही रोहित शर्माला ओपनिंगला खेळवण्याचा निर्णय होऊ शकतो, असं सांगितलं जात आहे.


वनडेमध्ये सर्वाधिक म्हणजेच ३ द्विशतकं आणि आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये ४ शतकं करणाऱ्या रोहितला टेस्ट क्रिकेटमध्ये त्याचं स्थान पक्कं करण्यात आलं नाही. वेस्ट इंडिज दौऱ्यामध्ये रोहित टेस्ट टीमसोबत असला तरी त्याला अंतिम ११ खेळाडूंमध्ये संधी मिळाली नाही.


दक्षिण आफ्रिकेविरुद्ध राहुलच्याऐवजी रोहितला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दक्षिण आफ्रिका ही या महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात ३ टी-२० आणि ३ टेस्ट मॅच खेळवण्यात येणार आहेत. या टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियाची निवड अजूनही झालेली नाही.