साऊथम्पटन : मागच्या वर्षभरामध्ये टीम इंडिया लागोपाठ क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे वर्ल्ड कप संपल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह यांना आराम देण्यात येणार आहे. ३ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मर्यादित ओव्हरच्या सीरिजमध्ये हे दोघं खेळणार नाहीत. ही सीरिज कॅरेबियन बेटांवर आणि अमेरिकेमध्ये खेळवली जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन्ही देशांमध्ये होणाऱ्या दोन टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी मात्र या दोघांचं टीममध्ये पुनरागमन होईल. या टेस्ट सीरिजपासून टीम इंडियाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपला सुरुवात होणार आहे.


'विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहला वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन टी-२० आणि तीन वनडे मॅचच्या सीरिजमध्ये आराम दिला जाईल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून विराट आणि बुमराह क्रिकेट खेळत आहेत. त्यामुळे ते वनडे आणि टी-२० सीरिजमध्ये दिसणार नाहीत,' असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं.


वर्ल्ड कपनंतर इतर काही खेळाडूंनाही आराम मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर भारत वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहोचला तर १४ जुलैपर्यंत खेळाडू वर्ल्ड कपमध्ये व्यस्त असतील. पहिले टी-२० आणि वनडे सीरिज आणि मग टेस्ट सीरिजचं वेळापत्रक बीसीसीआय आणि क्रिकेट वेस्ट इंडिजने बनवलं आहे.


'२२ ऑगस्टपासून एंटिगामध्ये पहिली टेस्ट मॅच सुरु होणार आहे. प्रमुख खेळाडूंना एवढा आराम पुरेसा आहे. कोहली आणि बुमराह १७ ते १९ ऑगस्टदरम्यान होणाऱ्या सराव सामन्याआधी टीम इंडियासोबत येतील', असा अंदाज बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने व्यक्त केला. मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ आणि हनुमा विहारी वेस्ट इंडिजमध्ये ए मॅच खेळतील. तर वरिष्ठ खेळाडू सराव सामना खेळतील.