लंडन : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा पराभव झाला. शेवटच्या इनिंगमध्ये १९४ रनचा पाठलाग करताना भारताची बॅटिंग गडगडली. या मॅचमध्ये विराट कोहली वगळता दुसऱ्या कोणत्याही बॅट्समनला चमकदार कामगिरी करता आली नाही. या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये कोहलीनं १४९ रन आणि दुसऱ्या इनिंगमध्ये ४९ रनची खेळी केली. भारतीय बॅटिंगच्या या कामगिरीवर माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं मौन बाळगणंच पसंत केलं. तुम्ही ५ दिवस कसे खेळलात याबद्दल मी बोलणार नाही पण तुमचे बॉलर २० विकेट घेत असतील तर तुम्ही मॅच जिंकू शकता. पहिल्या टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये भारतीय बॉलरनी उल्लेखनीय कामगिरी करत इंग्लंडच्या २० विकेट घेतल्या असं धोनी म्हणाला.


कोहली महान होण्याच्या जवळ


इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये शानदार कामगिरी केल्यानंतर विराट कोहली आयसीसीच्या टेस्ट क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. वनडे क्रिकेटमध्येही कोहली पहिल्या क्रमांकावरच आहे. कोहलीच्या या कामगिरीचंही धोनीनं कौतुक केलं आहे. विराट कोहली महान खेळाडू होण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. विराटनं देशातच नाही तर परदेशातही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कर्णधाराकडून अशाच कामगिरीची सगळ्यांना अपेक्षा असते, अशी प्रतिक्रिया धोनीनं दिली आहे.