केपटाऊन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा कसोटी सामन्यात पराभव पत्करल्यानंतर टीम इंडिया तिसऱ्या कसोटीसाठी मैदानात उतरली आहे. या सामन्यात कर्णधार विराट कोहली टीममध्ये परतला आहे. केपटाऊनमध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या सामन्यात विराट कोहलीने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र केएल राहुल आणि मयंक अग्रवाल लवकर बाद झाल्यानंतर विराट फलंदाजीला आला आणि त्याने त्याचा खेळ दाखवला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण जेव्हा विराट कोहली क्रीझवर आला तेव्हा काहीतरी खास घडलं. विराट कोहलीने पहिले 15 बॉल डॉट खेळले आणि एकही धाव घेतली नाही. पण 16व्या चेंडूवर विराट कोहलीने आपला आवडता शॉट खेळला आणि कव्हर ड्राईव्ह मारून उत्तम खेळाला सुरुवात केली.


गेल्या काही दिवसांपासून कोहली वाईट शॉट खेळून आऊट होत होता. यावेळी त्याच्यावर अनेकदा टीका देखील करण्यात आली. दरम्यान यावर तिसऱ्या सामन्यापूर्वी कर्णधार कोहलीने, मला कोणाला काहीही दाखवून द्यायचं नाही, असं विधान केलं होतं.


दरम्यान पहिल्या 15 बॉलमध्ये खास गोष्ट म्हणजे विराट कोहली बाहेर जाणारे बॉल टाळत होता. गेल्या काही सामन्यात विराट कोहली हीच चूक करत होता. त्याच्या बॅड पॅचमध्ये तो वारंवार बाहेर जाणाऱ्या चेंडू खेळून विकेट गमावताना दिसला.


बाहेर जाणार्‍या चेंडू सतत खेळत असल्याने विराट कोहलीला सचिन तेंडुलकरचा सल्ला घेण्याचं वारंवार सांगण्यात येत होतं. सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीमध्ये 241 धावांची खेळी खेळली, ज्यामध्ये त्याने एकही कव्हर ड्राइव्ह खेळला नव्हता.


दरम्यान कर्णधार विराट कोहलीच्या कारकिर्दीतील हा 99 वा कसोटी सामना आहे. गेल्या दोन वर्षांपासून चाहते त्याच्या शतकाची वाट पाहत आहेत. त्यामुळे सर्वांच्या नजरा शतकाकडे लागल्या आहेत.